बाजार समितीच्या निवडणूकीत दिग्गजांनी नामांकन दाखल केल्याने वाढली चुरस
नंदुरबार : जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, काल अखेरच्या दिवशी नामांकन दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली.दिवसभरात काल ४२५ नामांकने दाखल झाली. तर यापूर्वी ७७ नामांकने दाखल झाली होती. एकूण ५०२ नामांकने दाखल झाली असून दिग्गजांचा समावेश आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत इच्छुकांची यादी तयार करण्याचे काम सुरु होते.
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबारसह धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, शहादा व नवापूर या सहा बाजार समितींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. प्रत्येक बाजार समितीतील १८ संचालकांसाठी सदर निवडणूक होत आहे. यंदा सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीच्या रिंगणात उडी घेतल्याने निवडणूका चुरशीच्या होणार आहेत. दरम्यान, काल अखेरच्या दिवशी नामांकन दाखल करण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती. सकाळी ९ वाजेपासूनच नामांकन दाखल करण्यासाठी इच्छुक रांगेत उभे होते. दिवसभरात ४२५ नामांकने दाखल झाली. तर यापूर्वी ७७ नामांकने दाखल करण्यात होती. जिल्ह्यातील सहा बाजार समितींच्या १०८ संचालकांसाठी एकूण ५०२ नामांकने दाखल झाली आहेत.
यामध्ये सर्वाधिक शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १८२, नंदुरबार ९३, तळोदा ८६, नवापूर ६६, अक्कलकुवा ३८ तर अक्राणी ३७ अशी ५०२ इच्छुकांनी निवडणूकीची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीत ५ जागा बिनविरोध झाले आहेत. काल अंतिम दिवस असल्याने सकाळपासूनच उमेदवारांनी नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी केली होती.दरम्यान, तळोदा येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सचिन खैरनार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगलसिंग पावरा यांच्या देखरेखीखाली अर्ज दाखल करण्यात आले. तर दि.२० एप्रिल रोजी माघारीअंती रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, काल नामांकन दाखल करतेवेळी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षातील अनेक दिग्गजांनी नामांकन दाखल केले आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणूकीत दिग्गजांनी नामांकन दाखल केल्याने चुरस वाढली आहे.उद्या दि.५ रोजी छाननी होणार आहे. जिल्ह्यातील सहा बाजार समितींसाठी एकूण १० हजार १३५ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी २ हजार ७२७, नवापूर १ हजार ४५९, तळोदा १ हजार १०५, शहादा २ हजार ८३५, अक्कलकुवा ९९१ तर धडगाव १ हजार १८ मतदार हक्क बजावणार आहेत. यात सहकारी संस्थांचे २ हजार ६२८, व्यापारी ९३१, हमाल मापाडी ५१६ तर ६ हजार ६० इतके ग्रामपंचायत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
जीवन पाटील , कार्यकारी संपादक एम. डी. टी. व्ही. नंदुरबार