नंदुरबार/ शिर्डी: २३/३/२३
शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर येथे 24 ते 26 मार्च, 2023 या कालावधीत महापशुधन एक्स्पो-2023 चे आयोजन करण्यात आले आहे.
या अखिल भारतीय पशु-पक्षी प्रदर्शनास नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशु पालकांनी भेट देवून माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
हे पशु प्रदर्शन 46 एकर विस्तीर्ण जागेवर होणार असून यामध्ये महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यामधील उत्कृष्ट पशुधन, पशुपक्षी सहभागी होणार आहे.
या प्रदर्शनातुन पशुसंवर्धन विषयातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि शास्त्रोक्त पध्दतीने पशुपक्षी पालन व्यवसाय करण्यासाठी चालना मिळणार आहे.
भव्य डॉग व कॅट शो, 400 पेक्षा जास्त स्टॉल्स, भारतातील विविध जातींचे 1300 पेक्षा जास्त पशुधन, प्रात्यक्षिके,मुरघास,अर्थबंदिस्त शेळीपालन, परसातील कुक्कुट पालन गांडुळ खत,
मुक्तसंचार गोठा, चारा पिके, गोड्यापाण्यातील मत्स्यशेती, शासनाच्या विविध योजनांचे सादरीकरणाबरोबरच संयंत्रे, मुरघास, अझोला, लिंग निर्धारित रेतमात्रा, दुध, मांस, अंडी, लोकर, उत्पादन तंत्रज्ञान माहिती,
बेरोजगारांना स्वंयरोजगाराची संधी, , वैरण उत्पादन, प्रात्याक्षिके आदिंची माहिती या प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहेत.
तसेच 24 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत शेतकरी, शास्त्रज्ञ तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी या प्रदर्शनामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग व पशुपालक यांचाही सक्रीय सहभाग असणार आहे.
या प्रदर्शनाचे औचित्य साधुन नुकतेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, वित्त समिती सभापती गणेश पराडके, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, यांच्या हस्ते या प्रदर्शनाच्या महा पशुधन एक्स्पो-2023 लोगोचे नुकतेच अनावरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.उमेश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.प्रताप पावरा, सहायक आयुक्त डॉ.कुलकर्णी, पशुधन विकास अधिकारी डॉ.निकुंभे आदी उपस्थित होते.
प्रविण चव्हाण ,एम. डी. टी.व्ही न्यूज ,जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार.