नंदुरबार :२१/३/२३
बालविवाह ही अत्यंत गंभीर समस्या असून बालविवाहामुळे बालकांच्या विशेषत: मुलींच्या आयुष्यावर अनेक दुष्परिणाम होतात. बालविवाह या समस्येचे समुळ उच्चाटन झाले ..
तर बालविवाहामुळे होणाऱ्या इतर आरोग्याच्या समस्या (उदा.कुपोषण) या देखील कमी होण्यास मदत होईल.
या निरामय भावनेने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे संकल्पनेतून “ऑपरेशन अक्षता” या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांचे हस्ते शुभारंभ नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पटांगणात करण्यात आला होता.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी “ऑपरेशन अक्षता” यामध्ये गावातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी होवुन बाल विवाह रोखण्याची जबाबदारी पार पाडावी
तसेच महिलांसंबंधी घडणाऱ्या कौटुंबीक हिंसाचाराच्या व अन्य अत्याचाराच्या घटनांविषयी सजगता निर्माण व्हावी असा मनोदय व्यक्त केला होता.
शेवटच्या समाज घटकापावेतो राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात गाव पातळीवर काम करणारे महत्वाचे घटक सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांचादेखील सहभाग या उपक्रमात घेण्यात येणार आहे.
त्यावरुन समाज घटकातील प्रत्येकाने जबाबदारी ओळखून गावात बाल विवाह प्रतिबंधाबद्दल जनजागृती करुन या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले होते.
त्याअनुषंगाने तळोदा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांनी तळोदा तालुक्यापासून सुरु होणाऱ्या या पथदर्शी कार्यक्रमाचे महत्व लक्षात घेवून तातडीने कामकाजाची सुरुवात केली.
उपक्रमाच्या सुरुवातीनंतर पहिल्या पंधरवाड्यातच त्यांनी तळोदा तालुक्यातील बुधावल, सोमावल खु., नळगव्हाण, लोभाणी, तळवे, मोहिदा येथे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांची बैठक घेवून त्यांना ग्रामसभेत बाल विवाह विरोधी शपथ दिली.
तसेच नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांनी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कोपर्ली, इंद्री हट्टी, चौपाळे, शनिमांडळ, घोटाणे, आसाने, रनाळे, भादवड, आकराळे येथे आयोजित ग्रामसभेत बाल विवाहविरोधी शपथ दिली.
सदर ग्रामसभेत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी बालविवाह रोखणे, बालविवाह केल्याने महिलांना होणारा त्रास, बालविवाह केल्यास होणारी कायदेशीर कारवाई व शिक्षेबाबत तसेच महिलांच्या शरीरावर होणारे त्याचे दुष्परिणाम यांची माहिती देण्यात आली.
त्यानंतर बालविवाह प्रतिबंधाबाबत ठराव करण्यात आला.
बालविवाह रोखण्यासाठी गाव पातळीवर अक्षता समिती स्थापन करण्यात आली असून त्यात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील व बीट पोलीस अंमलदार यांची नेमणुक करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतींमध्ये ठराव तसेच बाल विवाहविरोधी शपथ कार्यक्रम घेवून नंदुरबार तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयात बाल विवाहविरोधी शपथ घेण्याचा मानस पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी व्यक्त केला आहे.
प्रविण चव्हाण ,एम. डी. टी.व्ही न्यूज ,नंदुरबार.