नंदुरबार :१०/३/२०२३
सर्वत्र होळी सणाची धामधूम सुरू असतांना सायंकाळी झालेल्या वादळी पावसाचा नंदुरबारकराना मोठा फटका बसला आहे.
जिल्ह्यातील तळोदा, शहादा व नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिकस्तरावर सुमारे 1525 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल कृषी विभागाने शासनाकडे पाठविला असून पंचनामे झाल्यावर नुकसानीच्या क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले असून भरीव नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात आधीच खरिप हंगाम कमी पावसामुळे अडचणीत आला.त्यात कापूस व कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. खरिपाच्या खर्चही उत्पादनातून निघेना झाला.
तर विहिरी व कुपनलिकांच्या अत्यल्प पावसात शेतकऱ्यानी रब्बीत गहू, हरबरा, ज्वारी, केळी, पपई, टरबूज, खरबूज आदी पिके घेतली. खते, बियाणे, कीटकनाशक याचा एकरी हजारो रुपये खर्च केला.
रात्री जागून पिकांना पाणी दिले. पिके काढणीला आली असताना मात्र दिनांक 7 मार्च रोजी होळीच्या दिवशी सायंकाळी जिल्हाभरात वादळी पावसाने थैमान घातले.
यात रब्बीतील वरील पिके हे वादळी वाऱ्यात जमीनदोस्त झाली. तळोदा, शहादा व नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक नुकसानीचा फटका बसला.
तर नवापूर, धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात देखील रब्बी पिकांसह फळ पिकांचे नुकसान झाले आहे.
प्राथमिक अहवालानुसार सुमारे 1525 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त करून तसा अहवाल शासनाला सादर केला आहे.
मात्र अद्याप पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्त क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ऐन काढणीच्या वेळी नुकसानीला सामोरे जावे लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सदर नुकसानीचे लवकर पंचनामे पूर्ण करून भरीव मदत द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यानी केली आहे.
जीवन पाटील, कार्यकारी संपादक एम.डी. टीव्ही नंदुरबार