कृषि निविष्ठांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भरारी पथके

0
184

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी दिली माहिती

1669932 dap

नंदुरबार: खरीप हंगाम 2023-2024 साठी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खते, बियाणे व किटकनाशके उपलब्ध करुन देण्यात आले असून बोगस बियाणे विक्रीला आळा घालणे, रासायनिक खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर भरारी पथक गठित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी दिली आहे.

हे भरारी पथक 1 एप्रिल,2023 पासून स्थापन केले असून जिल्हास्तरावर नियंत्रक तथा परवाना अधिकारी म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद हे भरारी पथकाचे प्रमुख असतील. पथकात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे सदस्य सचिव म्हणून तर उप विभागीय कृषि अधिकारी, नंदुरबार व शहादा, मोहिम अधिकारी व निरीक्षक वजनेमापे हे जिल्हास्तरीय सदस्य असतील.

तालुकास्तरावर सहा पथक स्थापन केले असून तालुका कृषि अधिकारी याच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके कार्यरत करण्यात आली असून कृषि अधिकारी, पंचायत समिती, तालुकास्तरीय निरीक्षक वजनेमापे, तसेच संबंधित कार्यक्षेत्राचे मंडळ कृषि अधिकारी हे सदस्‍य असतील.

तालुकास्तरावरील भरारी पथक प्रमुखाचे नाव व संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. नंदुरबार एस.ए.शेळके (9404110878), नवापूर बी.जे.गावीत (7588303692), अक्कलकुवा एन.ए.गढरी (9421512272), शहादा के.ई.हडपे (8055824864) तळोदा एन.आर.महाले (9420060528) तर अक्राणीसाठी आर.एस.महाले (9404970335 ) असे आहेत. या पथकामार्फत कृषि सेवा केंद्रांची वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळणार आहे. तसेच अनाधिकृतरित्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीला प्रतिबंध बसणार आहे.

शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाण्याची खरेदी करावी, बियाणे खरेदीची पावती, खरेदी केलेल्या बियाणे पाकिटाचे टॅग व लॉट क्रमांक पडताळून पाहावे. पेरणी झाल्यावर बियाणे पाकिट पीक निघेपर्यंत सांभाळून ठेवावे, शेतकऱ्यांनी अनधिकृत बियाण्याची खरेदी करु नये, कीटकनाशके, तण नाशकांची खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी. खत विक्री करणाऱ्या फ्लाय सेलर्सकडून खतांची खरेदी करु नये. जादा दराने कृषि निविष्ठाची विक्री करत असल्यास त्याबाबत तक्रार जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय पथकाकडे करावी. तसेच कृषि निविष्ठाविषयी असलेल्या अडचणी, तक्रारी व मार्गदर्शनासाठी कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18001801551/ 18002334000 वर संपर्क साधावा.

कृषि निविष्ठेच्या तक्रारीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

खरीप हंगाम 2023-2024 साठी जिल्हास्तरावर निविष्ठा, बियाणे, खते व किटकनाशके या संदर्भात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तक्रार निवारण नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षासाठी जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी जे.एस.बोराळे भ्रमणध्वनी क्रमांक (9359559680) , जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक एन.डी.पाडवी (9423959715) तर टिपणी सहायक डी. एस. बाविस्कर 9623810798 असा आहे. तसेच संपर्कासाठी ईमेल adozp@gmail.com, व dsaondb@gmail.com असा आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषि निविष्ठेबाबत तक्रार असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. भागेश्वर यांनी केले आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here