बोअरवेलच्या ट्रकने दुचाकीला दिली धडक, एक ठार..

0
123

नंदुरबार – ३०/३/२३

नवापूर बायपास रस्त्यावर शहरातील कल्याणेश्वर मंदीराजवळ बोअरवेल करणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात एकजण ठार झाला.

तर या अपघातात महिलेसह चिमुकला जखमी झाला आहे.

साक्री तालुक्यातील एैचाळे येथील रेखाबाई मांगीलाल भोये (वय २७) या पती मांगीलाल शिवलाल भोये (वय ४०) व मुलगा रुद्र (वय १० महिने) असे तिघेजण नंदुरबार येथील कोकणीहिल येथे बचतगटाच्या कामानिमित्त जाण्यासाठी येत होते.

सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीकडून कोकणीहिलकडे जात असतांना कल्याणेश्वर मंदिरासमोरील पुलाजवळ आले असता त्यांच्या मागून येणाऱ्या बोअरवेल करणाऱ्या ट्रकने (क्र.के.ए.०१ एमएन २१२२) दुचाकीला धडक दिली. ट्रक चालक नागराजन करपिया वेल्लालर (रा.अरंतागी जि.उदुपोट्टई, तामिळनाडू) याने रस्त्याचा व पुलाचा अंदाज न घेता भरधाव वेगात वाहन चालविले.

ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतांना त्याने दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.

अपघातात रेखाबाई भोये व त्यांचा मुलगा रुद्र असे रस्त्याच्या कडेला फेकले गेले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

तर मांगीलाल भोये रस्त्यावरच पडल्याने ट्रकचे मधले चाक त्यांच्या अंगावरुन व दुचाकीवरुन गेले.

यात मांगीलाल भोये यांच्या कंबरेला, उजव्या पायाच्या मांंडीवर व पंजाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, पोलिस निरीक्षक अर्जुन पटले याच रस्त्याने पोलिस मुख्यालयाकडे जात असतांना त्यांनी घटनास्थळी थांबून जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली.

मांगीलाल भोये यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉ.तुंगारे यांनी त्यांना तपासणी करुन मयत घोषीत केले.

अपघातात दुचाकी चक्काचूर झाली होती. अपघात घडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने रस्त्यावर काहीवेळ वाहतूक ठप्प झाली होती.

याप्रकरणी रेखाबाई भोये यांच्या फिर्यादीवरुन ट्रकचालक नागराजन करपिया वेल्लालर (रा.अरंतागी जि.उदुपोट्टई, तामिळनाडू) याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदा पाटील करीत आहेत.

जीवन पाटील,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here