मुंबई -७/७/२३
Mumbai Shivsena News : शिवसेनेच्या रणरागिनी, पीडित महिलांचा आवाज आणि ठाकरे गटाची बाजू अभ्यासू आणि खंबीरपणे मांडणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला हा मोठा धक्का समजला जातोय.
एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत. मात्र त्या बंडानंतरचा हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण नीलम गोऱ्हे ह्या केवळ विधान परिषदेच्या आमदार नाहीत तर त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहे. महत्त्वाचं म्हणजे नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता तेव्हापासून त्या अत्यंत संयमाने, नेटाने आणि अभ्यासू वृत्तीने शिवसेनेची बाजू मांडत आहेत.



WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नीलम गोऱ्हे ह्या केवळ एक राजकीय नेत्या नाहीत तर त्यांनी उपेक्षित, पीडित महिलांसाठी मोठं काम उभं केलेलं आहे. एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून नीलम गोऱ्हेंकडे बघितलं जातं. आजचा त्यांचा निर्णय हा ठाकरे गटातली उरली सुरली नारजी चव्हाट्यावर आणणारा आहे. त्यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाने ठाकरेंना धक्का बसला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुषमा अंधारे यांनी प्रवेश केल्यानंतर अनेक नेत्यांची नाराजी उघड झालेली होती. दीपाली सय्यद, मनिषा कायंदे आणि आता नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर अनेक नेत्यांनी संजय राऊतांवर खापर फोडलं होतं. आता सुषमा अंधारेंवर महिला नेत्या खापर फोडत आहेत.
आज सकाळपासूनच नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार, अशा बातम्या सुरु होत्या. मात्र थेटपणे त्यांचं नाव घेतलं जात नव्हतं. त्यांचा मोबाईलही नॉट रिचेबल येत होता. शेवटी नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं स्पष्ट होत आहे.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रविण दरेकर उपस्थित होते.
एम डी टी व्ही न्युज ब्युरो ,मुंबई