नंदुरबार : १२/३/२०२३
गुजरात राज्यात कापूस विक्री करून घराकडे परतत असतांना भालेर रस्त्यावरील होळ फाट्याजवळ स्विफ्ट डिझायर मधून आलेल्या चौघा संशयितांनी पिस्तूलचा धाक दाखवून व मिरचीपूड फेकून शेतकऱ्यांकडील १४ लाखांची रोकड हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली होती.
पोलीसांनी या गुन्ह्याचा अवघा ३० तासात छडा लावून पाच संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दरम्यान, या घटनेत कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना गुजरात राज्यात नेणारा व्यापारीच मुख्य सूत्रधार निघाला आहे.
शेतकऱ्यांच्या दिशेने मिरचीपूड भिरकावून १३ लाख ९४ हजाराची रोकड हिसकावून पसार झाले होते.
याबाबत शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी तपासाची चक्रे गतिमान करत पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे ६ वेगवेगळे पथके तयार करुन गुजरात, मध्य प्रदेश राज्यात रवाना करण्यात आले होते.
पोलीस तपासादरम्यान भालेर रस्त्यावर शेतकऱ्यांना लुटीत शेतकऱ्यांसोबत गुजरात राज्यात कापुस विक्रीसाठी गेलेल्या व्यापाऱ्याचे संबंध असण्याची शक्यता असल्याचे समजले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी शेतकरी माल घेवून गेलेल्या गाडीचा चालक व सोबत असलेल्या कापुस व्यापाऱ्याला दि.११ मार्च रोजी गुप्तपणे व कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता कापुस व्यापारी उमेश पाटील हा विचारपूस करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात आले.
मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ धुळे जिल्ह्यातील धामणगांव गाठून एकाचवेळी तिघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांना त्यांचे नाव गाव विचारले असता चैत्राम ऊर्फ झेंडु राजधर पाटील (वय- ४१), सागर ऊर्फ बंटी
सुभाष पाटील (वय-२४), दिपक ऊर्फ बबलू सुभाष पाटील (वय-२६, तिन्ही रा. धामणगांव ता.जि. धुळे) असे सांगितले. तिघांनी गुन्ह्याची कबुली देत हिसकावलेले पैसे, बंदुक दिपक ऊर्फ बबलु यांचे शेतातील झोपडीमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. तसेच गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन हे चौथा साथीदार धुळे जिल्ह्यातील शिरुड गावातील राहुल भोईचे असल्याचे सांगितले.
पोलीसांनी शेतातील झोपडीमधून एका कॅनमधून १३ लाख २६ हजार ५४० रुपये रोख, लोखंडी बनावटीचे पिस्तुल, चार जिवंत काडतूस कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत केले.
तसेच शिरुड येथून राहुल बळीराम भोई (वय-२५, रा. शिरुड ता.जि.धुळे) यास ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात २०० रुपये किंमतीचा एक लोखंडी धारदार चाकू मिळून आला.
त्यास गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी वाहनाबाबत विचारपूस केली असता घराच्या बाजूला झाकुन ठेवलेल्या कारकडे बोट दाखवून हीच गाडी गुन्हा करतेवेळी वापरली असल्याचे सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील व संपुर्ण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
जीवन पाटील ,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज,नंदुरबार