मुंबई -३०/५/२३
मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राज्यातील सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व तयारीचा सर्वंकष आढावा घेण्यात आला.
येत्या पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे.
शोध मोहिम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात सर्व अधिकाऱ्यांनी चोवीस तास फोन सुरु ठेवावेत. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा-विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय राखावा, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या बैठकीत दिले. उपस्थित अधिकारी तसेच सर्व विभागीय आयुक्तांकडून मुख्यमंत्र्यांनी आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापनाबाबत सज्जतेचा आढावा घेतला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश :
✅ भूस्खलन झालेल्या भागातील नागरिकांशी संवाद साधा. पुन्हा काही लोक त्या भागात रहिवासासाठी गेले असतील, तर त्यांची माहिती घ्या. त्यांच्याशी संवाद साधा. त्यांचे स्थलांतर आणि पुनर्वसनाबाबत आतापासूनच तयारी करा.
✅ स्थलांतरितांसाठी बहुउद्देशीय सभागृहे, शाळा किंवा तत्सम निवारे उपलब्धता याबाबत तयारी करून ठेवावी. याठिकाणी आवश्यक अन्न-धान्य तसेच औषधांचा साठा याबाबत संबंधित विभागांना आतापासूनच काळजी घ्यावी.
✅ पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावात आतापासूनच औषधांचा पुरेसा साठा राहील, असे पहावे. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणीही तयारी ठेवा. संर्पदंशावरील लसी उपलब्ध राहतील, याची खात्री करा.
✅ वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी महावितरणने सतर्क राहणे आवश्यक आहे.
✅ एनडीआरएफ, एसडीआरफशी संपर्क-समन्वय राखा.
✅ हवामान खात्याकडून दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांबाबत सतर्क रहा.
✅ जीवरक्षकांची आवश्यकता भासल्यास त्यांची मानधन तत्वावरही नेमणूक करण्यात यावी.
✅ पावसाळा सुरु होण्यापूर्वीच राज्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहिम हाती घेण्यात यावी.
✅ पंढरपूरला विशेष निधी दिला आहे. आषाढी वारीपूर्वी या रस्त्यांची दुरुस्तीकडेही लक्ष द्या
✅ भविष्यातील जीवितहानी टाळण्यासाठी राज्यातील सर्वच महापालिकांनी धोकादायक इमारतींचे त्रयस्थ अभियांत्रिकी संस्थांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या.
✅ मुंबईबरोबरच अन्य ठिकाणीही नालेसफाईवर चांगल्या पद्धतीने लक्ष दिल्यास सखल भागात पाणी साचून होणारे नुकसान टाळता येईल. काही अंशी पुराचा धोका टाळता येईल. मुंबईत रेल्वे आणि महापालिकेने नाले सफाईबाबत संयुक्त मोहिम राबवावी. त्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय आणि संपर्क राखावा.
✅ एनडीआरएफ, एसडीआरफ तसेच लष्कर, नौदल, हवाईदल यांच्या मागणीनुसार आपत्ती व्यवस्थापनात जीवितहानी होऊ नये शोध आणि बचाव मोहिमेसाठी आवश्यक अशी उपकरणे तत्काळ उपलब्ध होतील यासाठी प्राधान्याने कार्यवाही करा.
✅ ठाणे, येथे एनडीआरएफसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे पुणे आणि कोल्हापूर या भागात जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून पावसाळ्यापूर्वीच या दलाचे तळ तेथे प्रभावीपणे कार्यरत होतील.
✅ पावसाळ्यात जलसंपदा विभागाने आतापासूनच सतर्क राहावे. कोल्हापूर-सांगली भागातील पूराबाबत कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या यंत्रणेशी संपर्क-समन्वय राखावा यासाठी काळजीपूर्वक नियोजन करावे.
✅ नागपूर विभागाने मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून होणारा विसर्ग आणि तेलंगणातील मेडीगट्टाची पातळी याबाबत संपर्क-समन्वय राखल्यास गडचिरोली आणि अन्य परिसराला पाण्याचा फटका बसणार नाही.
✅ मराठवाड्यात वीज कोसळून होणाऱ्या मृत्युंबाबत वीज कोसळण्याचा इशारा देणाऱ्या ‘लायटनिंग अलर्ट आणि लायटनिंग ॲरेस्टरबाबत संबंधित सर्वच विभागांनी वेळेत कार्यवाही करावी. जेणेकरून लोकांना वेळेत इशारा मिळेल आणि जीवितहानी टळेल.
✅ मुंबईतील परिस्थितीबाबत रेल्वे व महापालिकेने समन्वय राखावा. लोहमार्गांवर पाणी साचू नये यासाठी नालेसफाई चांगल्या पद्धतीने होईल यावर भर द्यावा.
✅ परिस्थिती उद्भवल्यास महापालिकेने बसेसची उपलब्धता, शाळा आणि निवाऱ्याची सोय, पिण्याचे पाणी- अन्नपदार्थ यांबाबत नियोजन करावे. कोकण रेल्वे तसेच कोकणातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याबाबत वेळीच सर्व यंत्रणांना इशारा द्यावा.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई