जि प सदस्य रतन पाडवी यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नंदुरबार : मार्च महिन्यात धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला आहे. यात प्रामुख्याने आंबा, महू व चारोळी या झाडांना मार्च महिन्यातच मोहर येतो. मात्र नेमके त्याचवेळी अवकाळीने दस्तक दिल्यामुळे मोहर गळून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे तात्काळ पंचनामे करुन भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जि.प.सदस्य रतन पाडवी यांनी केली असून याबाबत जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना निवेदन दिले आहे.
दि.२ मार्च ते २३ मार्च या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात आंबा, महू व चारोळी या झाडांना मोहर येतो व इतर हंगामी शेतकऱ्यांचे मका, हरभरा, गहू, भगर, टरबूज व डांगर यावर उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र एैनवेळी आलेल्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे.
अवकाळीमुळे झाडावरील मोहर गळून पडल्याने व हंगामी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे उपजिविकेचे साधन हिरावले गेले आहे. कोकण, विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ज्या प्रकारे नुकसान भरपाई देण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावी.
धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह व उत्पन्नाचे साधन हे आंबा, महू व चारोळी या झाडांवर अवलंबून असल्याने तसेच हंगामी शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह करण्याचे साधन हिरावल्याने शेतकऱ्यांवर संकट आले आहे. यामुळे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाईची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी जि.प.सदस्य तथा जि.प.सभागृह विरोधी पक्षनेते रतन पाडवी यांनी केली आहे.