मुंबई -६/४/२३
आपल्या देशात पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात होती. काळाच्या ओघात ही पद्धत मागे पडत गेली आणि विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात आली.
सध्या बहुतांश कुटुंबांमध्ये तीन किंवा चारच व्यक्ती राहतात.
अशा परिस्थितीत अनेकांना घरातल्या ज्येष्ठ सदस्यांची अडचण वाटू लागते आणि ते ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करतात. काही ठिकाणी तर परिस्थिती इतकी बिकट आहे, की घरातल्या ज्येष्ठांना वृद्धाश्रमात पाठवलं जात आहे. उत्तर प्रदेशात आग्रा इथे अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
अब्जाधीशांमध्ये गणती होणाऱ्या कुटुंबातल्या 87 वर्षीय महिलेला वृद्धाश्रमात राहावं लागत आहे.
या महिलेला चार मुलं असून चौघांचीही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. असं असतानाही अनेक महिने ही वृद्ध महिला दारोदार भटकत होती.
कारण चारपैकी एकही मुलगा आणि सून या महिलेला घरात ठेवायला तयार नाही
गोपीचंद अग्रवाल यांच्या पत्नी
विद्या देवी असं या वृद्ध महिलेचं नाव आहे.
त्या आग्रा इथल्या प्रख्यात नेत्र रुग्णालयाचे संस्थापक गोपीचंद अग्रवाल यांच्या पत्नी आहेत.
गोपीचंद यांची गणना शहरातल्या अब्जाधीशांमध्ये होत होती. विद्या देवी आपल्या चार मुलांसह आलिशान घरात राहत होत्या.
त्यांनी चारही मुलांना स्वत:च्या पायावर उभं करून त्यांची लग्नं लावून दिली.
13 वर्षांपूर्वी गोपीचंद यांचं निधन झालं आणि हळूहळू विद्या देवी यांचं आयुष्य बदलू लागलं.
मुलांनी मालमत्ता वाटून घेतली. वृद्ध आईला काहीच दिलं नाही.
सुनेकडून त्रास
विद्या देवी काही दिवस मोठ्या मुलाकडे राहिल्या; पण तिथे सुनेनं त्यांना टोमणे मारण्यास सुरुवात केली.
त्यानंतर त्या काही दिवस तिन्ही मुलांकडे राहिल्या; पण तिथेही हीच परिस्थिती होती. सुनांनी त्यांच्या कपड्याची दुर्गंधी येत असल्याचं सांगितलं आणि ते त्यांना यमुनेत फेकून देण्यास सांगितले.
अपमान होऊनही विद्या देवी घराबाहेर पडल्या नाहीत, तेव्हा मुलानं वृद्ध आईला मारहाण करून घराबाहेर काढलं.
विद्या देवींच्या नातेवाईक आणि अग्रवाल महिला मंचच्या अध्यक्षा शशी गोयल यांना ही बाब समजताच त्यांनी विद्या देवींच्या मुलांना समजवण्याचा प्रयत्न केला;
पण, त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही.
म्हणून 19 डिसेंबरला शशी गोयल यांनी विद्या देवी यांना रामलाल वृद्धाश्रमात आणलं.
सध्या विद्या देवी वृद्धाश्रमात राहत आहेत. वृद्धाश्रमात विद्यादेवींची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचं आश्रम व्यवस्थापकानं सांगितलं.
आयएएसच्या आजी-आजोबांची आत्महत्या
काही दिवसांपूर्वी हरियाणातल्या चरखी-दादरी इथल्या बधडामधल्या शिव कॉलनीत राहणारे 78 वर्षीय जगदीश चंद्र आर्य आणि 77 वर्षीय भागली देवी यांनी सल्फासच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली. मृत वृद्ध जोडपं चरखी दादरी इथले आयएएस अधिकारी विवेक आर्य यांचे आजी-आजोबा होते.
विवेक यांचे वडील वीरेंद्र यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे.
तरीही वृद्ध जोडप्याला दोन वेळचं जेवणही नीट मिळत नव्हतं.
आत्महत्या करण्यापूर्वी दाम्पत्यानं सुसाईड नोट लिहली होती आणि नंतर सल्फासच्या गोळ्या खाल्ल्या.
पोलीस हेल्पलाइनवर फोन करून त्यांनी सल्फासच्या गोळ्या खाल्ल्याचं सांगितलं.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर अत्यवस्थ असलेल्या दोघांनी सुसाइड नोट पोलिसांच्या हाती दिली.
या दाम्पत्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सुसाइड नोटमध्ये दाम्पत्यानं त्यांच्या दोन सुना, पुतण्या आणि मुलावर गंभीर आरोप केले.
तसंच त्यांची सर्व संपत्ती दान करावी असंही सांगितलं.
ब्युरो रिपोर्ट ,एम डी टी व्ही न्यूज मुंबई