अनुदान व बीजभांडवल योजनेचा लाभ घ्यावा; जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे..

0
106

नंदुरबार -२७/४/२३

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या 50 टक्के अनुदान व 20 टक्के बीजभांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

नंदुरबार जिल्ह्याकरीता 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी 25 लाभार्थ्यांना अनुदान योजनेचा तर 15 लाभार्थ्यांना बीजभांडवल योजनेचा कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे.

मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील व्यक्तींना या योजनेद्वारे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

योजनेचे स्वरुप
अनुदान योजना- प्रकल्प मर्यादा 50 हजार पर्यंत गुंतवणूक असलेल्या कर्ज प्रकरणांत महामंडळाकडून अनुदान देण्यात येते,

प्रकल्पखर्चाच्या 50 टक्के किंवा 10 हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल. बॅंक कर्ज अनुदान वगळुन बाकीची सर्व रक्कम बँकेचे कर्ज असते. या कर्जावर बँकेच्या दराप्रमाणे व्याज आकारणी केली जाते.

बीज भांडवल योजना- प्रकल्प मर्यादा 50 हजार ते 7 लाखापर्यंत. बँककर्ज 50 हजार ते 7 लाखापर्यंत मंजुर करण्यात येते.

कर्ज प्रकरणामध्ये 10 हजार अनुदान वगळता उर्वरीत कर्ज राशीमध्ये 5 टक्के अर्जदारांचा सहभाग, महामंडळाचे कर्ज 20 टक्के (10 हजार अनुदानासह ) बँकेचे कर्ज 75 टक्के कर्जाची विभागणी राहील. कर्जाची परतफेड बँकेच्या व्याजासह बँकेकडे करावयाची असून महामंडळाचे कर्ज द.सा.द.शे 4 टक्के व्याजासह महामंडळाकडे परतफेड करावयाची आहे.

पात्रतेचे निकष

अर्जदार हा मातंग समाज व तत्स्मम 12 पोटजातीतील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षपेक्षा जास्त नसावे. अर्जदार या जिल्ह्याचा रहिवासी असावा.अर्जदाराने या महामंडळाकडून यापुर्वी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

केंद्रीय महामंडळाच्या सर्व योजनेसाठी ग्रामीण व शहरी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे.

राज्य शासनाच्या सर्व योजनेसाठी ग्रामीण व शहरी भागातील वार्षिंक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे.एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव असावा.

अर्जदारास महामंडळाच्या नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे, प्रमाणपत्रे, कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील.

अर्जदाराचा जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, पासपोर्ट फोटो,शैक्षणिक दाखला, रेशनकार्ड,आधार कार्ड, लाभार्थ्यांचा मोबाईल क्रमांक, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेचा पुरावा, किंवा जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्क पुरवा, वाहन व्यवसायाकरीता ड्रायव्हींग परवाना, आर.टी.ओ कडील प्रवाशी वाहतूक परवान, वाहनाच्या बुकींगसाठी अधिकृत विक्रेता / कंपनीचे दरपत्रक, व्यवसायसंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र,अनुभवाचा दाखला, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, खरेदी करावयाच्या मालाचे कोटेशन, प्रतिज्ञा पत्र अर्जासोबत कार्यालयात जमा करावेत.

कर्ज योजनेचे अर्ज कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहे. हे अर्ज कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते सांय. 6.15 पर्यंत स्विकारले जातील.

प्राप्त कर्जप्रकरणांची छाननी, तपासणी शासन निर्णयानुसार करण्यात येऊन लाभार्थी निवड समितीच्या बैठकीमध्ये संबधित अर्ज ठेवण्यात येतील.

लाभार्थी समितीमध्ये मंजुर झालेल्या पात्र लाभार्थीचे प्रस्ताव पुढील कार्यवाहीस बँकेस पाठविण्यात येतील.

 मांतग समाजातील होतकरु महिला, पुरुष, प्रशिक्षित लाभार्थीनीं या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. नंदुरबार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार दूरध्वनी क्रमांक 02564-210181 वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक  कसबे यांनी केले आहे.

प्रविण चव्हाण एम डी टीव्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here