तत्कालीन सरपंचासह प्रशासक, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर फौजदारीचे आदर्श..
नंदुरबार -८/४/२३
अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीचे सन २०१६-१७ ते सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या लेखा परीक्षणात आक्षेपाधिन रकमा व अनियमितता घोषीत करुन सादर करण्यात आलेल्या चौकशी अहवालानुसार त्या-त्या काळातील संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी अक्कलकुवा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या कालावधीत तब्बल ३ कोटी ३४ लाख ७९ हजार ४९३ रुपयांची अनियमितता झाल्याचे सदरच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
सीईओंनी बीडीओंना दिलेल्या आदेशात म्हटल्याप्रमाणे, अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत सन २०१६-१७ या वर्षात अमरसिंग वळवी १ एप्रिल ते २५ जुलै २०१६ या कालावधीत सरपंच, ताज मोहंमद अल्लारखॉँ मक्राणी हे उपसरपंच तर त्यानंतर प्रशासक म्हणून तत्कालिन विस्तार अधिकारी एम.आर.देव, कृषी अधिकारी जे.एस.बोराळे कार्यरत होते. याच कालावधीत बी.बी.जाधव ग्रामविकास अधिकारी होते. सन २०१६-१७ या वर्षात चौदाव्या केंद्र विकास वित्त कार्यक्रमाबाबत ३५ लाख १४ हजार ८५१ रुपये, ग्राम निधीतील विकास कामांबाबत ६ लाख ९२ हजार ९०० रुपये, पाणी पुरवठा दुरुस्ती खर्चाचे १ लाख ५७ हजार ६०२ रुपये व इतिवृत्त नोंद वही उपलब्ध न झाल्याने त्यातील ग्रामनिधी व पाणी पुरवठा निधीचे ५२ लाख ८३ हजार ९१७ रुपये अशी एकूण ८७ लाख ९८ हजार ५६८ रुपये इतकी रक्कम आक्षेपाधिन ठेवण्यात आली आहे.
सन २०१७-१८ मध्ये कृषी अधिकारी जे.एस.बोराळे प्रशासक, उषाबाई बोरा सरपंच, व्ही.बी.जाधव ग्रामविकास अधिकारी तसेच ए.ओ.वळवी यांनी देखील दोन महिन्यांसाठी ग्रामविकास अधिकारी पदाचा कार्यभार घेतला होता.
या कालावधीत ग्रामपंचायतीने ग्रामनिधीतून केलेल्या बांधकामाबाबत १६ लाख ४९ हजार, चौदाव्या वित्त आयोगातून केलेल्या बांधकामातून १ कोटी ३४ लाख १८ हजार तसेच मुल्यांकनापेक्षा जास्त खर्च केलेली १ लाख २० हजार ५८६ रुपये अशी १ कोटी ५० लाख ६७ हजाराची रक्कम आक्षेपाधिन ठेवून संबंधित ग्रामविकास अधिकारी व प्रशासक यास जबाबदार असल्याचे सीईओंनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सन २०१८-१९ च्या लेखा परीक्षणातून सरपंच उषाबाई बोरा व ग्रामविकास अधिकारी ए.ओ.वळवी असतांना या कालावधीत ग्रामपंचायतीने पेसा निधीतून केलेल्या बांधकामातील १० लाख ९१ हजार, चौदाव्या वित्त आयोगातून बांधकाम केलेली ७२ लाख २ हजार ७२५ रुपये तसेच ग्रामनिधीतून प्राप्त अनुदानातून केलेल्या बांधकामातील ९ लाख रुपये, वैयक्तिक शौचालयाच्या अनुदानातील ४ लाख २० हजार रुपये यासह ट्रॅक्टर वाहनाचे लॉकबूक व दुरुस्ती खर्चातील नियमबाह्य खर्च झालेली ४ लाख ८७ हजार १८९ रुपये अशी सुमारे ९६ लाख १३ हजार ७२५ रुपये एवढी रक्कम आक्षेपाधिन ठेवण्यात आली असून यास तत्कालिन सरपंच व ग्रामविकास अधिकारी जबाबदार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
गुन्हा दाखल करण्याचे आदेश
जे.एस.बोराळे (तत्कालिन प्रशासक तथा कृषी अधिकारी, अक्कलकुवा पं.स.), एम.आर.देव (तत्कालिन प्रशासक तथा तत्कालिन विस्तार अधिकारी), व्ही.बी.जाधव (तत्कालिन ग्रामाविकास अधिकारी), उषाबाई बोरा (तत्कालिन सरपंच), आनंदा पाडवी (तत्कालिन ग्रामविकास अधिकारी), ५ टक्के पेसा अंबंधनिधी अंतर्गत अक्कलकुवा, मिठ्याफळी व मक्राणीफळी ग्रामकोष समितीचे संबंधित ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी, समिती अध्यक्ष व सदस्य यांच्यावर गुन्ह दाखल करण्याचे आदेश सीईओनी दिले आहेत.
सन २०१६-१७, सन २०१७-१८, सन २०१९-२० अन्वये लेखा परीक्षणामध्ये आक्षेपाधिन ठेवलेली रक्कम ३ कोटी ३४ लाख ७९ हजार इतकी आहे. सदर रक्कम अनियमितता घोषीत करुन त्यास लेखा परीक्षणात नमूद केल्याप्रमाणे त्या-त्या कालावधीतील सरपंच, प्रशासक, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार जबाबदार आहे. त्याचप्रमाणे सन २०१६-१७, सन २०१७-१८ व सन २०१९-२० अन्वये लेखा परीक्षणामध्ये वसूल पात्र रक्कम १० लाख ८७ हजार ७७५ इतकी आहे. यास देखील त्या कालावधीतील ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी जबाबदार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कोट करा….
अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीत सन २०१६ ते २०१९ या कालावधीतील लेखा परीक्षणात झालेल्या विकासकामात अनियमितता झाल्याचे दिसून आले आहे. याबाबत न्यायालयात देखील रिपिटीशन दाखल झाले आहे. दरम्यान, चौकशीअंती त्या-त्या कालावधीतील ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच यास जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. या कालावधीत एकूण ३ कोटी ३४ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या निधीची अनियमितता झाली आहे. त्यावरुन संबंधित बीडीओंना संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
–रघुनाथ गावडे
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.नंदुरबार
एम.डी.टी.व्ही.न्युज ब्यूरो नंदुरबार