कोल्हापूर -२३/५/२३
जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पोलिसांसाठी प्रतिवर्षी रिफ्रेशर कोर्स कोरोनामुळे दोन वर्षापासून बंद होता.
सोमवारपासून हा रिफ्रेशर कोर्स सुरु होत आहे. यंदा पारंपरिक कोर्सला फाटा देत रिफ्रेशर कोर्समध्ये सायकॉलॉजी, फॉरेन्सिक, कायदेतज्ञांसह योग अभ्यांसाचा समावेश केला आहे.या तीनही विभागाचे तज्ञ 15 दिवस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पोलिसांना कामामध्ये वेल ट्रेन करण्यासोबतच त्यांचे शारिरीक, मानसिक आरोग्यही सक्षम करण्यावर यामध्ये भर दिला आहे.
प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या दैनंदिन कामामध्ये प्रशिक्षित करण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने प्रतिवर्षी 15 दिवसांचे रिफ्रेशर ट्रेनिंग कोर्स घेतला जातो. जिह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातून ठराविक कर्मचारी नेमून 15 कर्मचाऱ्यांना रोटेशन पद्धतीने ट्रेनिंग दिले जाते.कोरोनामुळे दोन वर्षापासून ट्रेनिंग बंद होते.
मात्र हा कोर्स सोमवारपासून सुरु होत आहे. यंदापासून रिफ्रेशर कोर्समध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
पोलिसांच्या मानसिक आरोग्याचीही काळजी
पोलीस दलात काम करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांच्या शारिरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याकडेही दुर्लक्ष होत असते.
बंदोबस्तातील तणावामुळे त्यांच्या खासगी आयुष्यातही काही प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे काही कर्मचारी नैराश्यग्रस्त होतात, व्यसनांकडे वळतात, हीच बाब ओळखून या वर्षीपासून रिफ्रेशर ट्रेनिंगमध्ये सायकॉलॉजिकल सेशन ठेवले आहे. यासाठी एमडी सायकॉलॉजी असलेल्या डॉक्टरांची नेमणूक केली आहे.
15 दिवसांमध्ये दोन सेशनमध्ये ते कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत.त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असून कर्मचाऱ्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे काम ते करणार आहेत.
‘फॉरेन्सिक’चे आधुनिक धडे
रिफ्रेशन कोर्समध्ये यंदापासून फॉरेन्सिकबाबतचेही धडे दिले जाणार आहेत. कोल्हापुरात फॉरेन्सिक लॅब सुरु झाल्यामुळे कोल्हापूर पोलिसांची पुणे वारी वाचली आहे.
मात्र गुह्यातील मुद्देमाल फॉरेन्सिक तपासणीसाठी देताना अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून काही त्रुटी राहतात. त्यामुळे तपासात किंवा फॉरेन्सिकचा अहवाल येण्यास विलंब लागतो.
या त्रुटी दूर करण्यासाठी ट्रेनिंगमध्ये फॉरेन्सिक येथील तज्ञ अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधणार आहे. त्यांना मार्गदर्शन करुन मुद्देमाल फॉरेन्सिक लॅबकडे कशा पद्धतीने जमा करायचा, याबाबत मार्गदर्शन करणार आहे.
सीपीआरमधील हॉस्पिटलमधील डॉक्टरही शवविच्छेदन, शवविच्छेदन अहवालाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. फायर टेस्टमध्ये येणाऱ्या त्रुटींचे निराकरण करण्यात येणार आहे.
कायदेतज्ञांचेही मार्गदर्शन
एखादा गुन्हा घडल्यानंतर त्यातील संशयितांच्या दोषसिद्धतेचे प्रमाण वाढावे यासाठी यावर्षीपासून रिफ्रेशर कोर्समध्ये कायदेतज्ञांनाही सामावून घेण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालयाच्या मदतीने सरकारी वकील या कोर्समध्ये दोन दिवस विशेष सत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
गुन्हा दाखल करणे, पिडीत किंवा तक्रारदाराचा जबाब कसा घेणे, न्यायालयात दोषारोपपत्र पाठवताना घ्यावयाची खबरदारी, दोषारोपपत्रामध्ये राहणाऱ्या त्रुटीबाबत त्यांच्याकडून मार्गदर्शन होणार आहे. याचसोबत कायद्यातील नवीन बदल, सर्वोच्च न्यायालयाचे नव्याने आलेले निर्देश याचीही माहिती देण्यात येणार आहे.
टीम बिल्डींगचेही सेशन
प्रत्येक पोलीस ठाण्यातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची मिळून 35 जणाची बॅच करण्यात येते. या सर्वांमध्ये कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी टीम बिल्डींग या विशेष सेशनचे आयोजन केले आहे. यामध्ये इनडोअर, आऊटडोअर गेम्स तसेच मोटीव्हेशनल सेशनचा समावेश आहे.
यासाठी 15 दिवसांपैकी 1 दिवस मुख्यालयातून या कर्मचाऱ्यांना बाहेर नेण्यात येणार आहे. त्यांना चित्रपटही दाखवण्यात येणार आहे.
आहारतज्ञांकडूनही मार्गदर्शन देण्यात हेणार आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी तणावपूर्ण असते. कायदा व सुव्यस्था सांभाळताना त्यांना कुटूंबाला पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे पोलीस मानसिक तणावाखाली असतात. त्यांना तणावमुक्त करण्यासाठी यंदापासून रिफ्रेशर कोर्समध्ये बदल केले आहेत. जेणेकरुन कर्मचाऱ्यांना तणावमुक्त काम करता येईल.
सारिका गायकवाड ,प्रतिनिधी ,कोल्हापूर ,एम डी टी व्ही न्यूज