सहा कृऊबा समितींमध्ये ४६३ अर्ज शिल्लक
माघारीकडे जिल्हावासीयांचे लक्ष
नंदुरबार : जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, दिनांक ५ रोजी नामांकन छाननीत ३९ अर्ज विविध कारणांनी बाद ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे आता ४६३ अर्ज शिल्लक असून यातून कितीजण माघार घेतात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव व नवापूर या सहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.
त्यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगातर्फे प्रक्रिया सुरू झाली आहे.
दरम्यान, काल दिनांक ५ रोजी दाखल अर्जाची छाननी करण्यात आली. यात विविध कारणांनी ३९ अर्ज बाद ठरविण्यात आले.यात नंदुरबार २, शहादा ७, नवापूर १०, तळोदा ९, अक्कलकुवा १ व धडगाव १० अर्ज बाद झाले आहेत.
छाननी नंतर ४६३ अर्ज शिल्लक आहेत. यात नंदुरबार ९१, शहादा १७५, नवापूर ५६, तळोदा ७७, अक्कलकुवा ३७, धडगाव २७ अर्ज आहेत.
६ एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत माघारीची मुदत आहे. यात कोण कोण मागार घेतो की निवडणुकीत भाऊगर्दी होणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
६ एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत माघारीची मुदत आहे.निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना २१ एप्रिल रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. २८ एप्रिल रोजी आवश्यक असल्यास निवडणूक घेण्यात येणार असून मतदानाच्या तीन दिवसांच्या कालावधीत मतमोजणी करण्यात येणार आहे. निवडणूक निरीक्षक म्हणून अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम काम पाहत आहेत.
सध्या निवडणूक प्रक्रिया पहिल्या टप्प्यात असली तरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला लागले आहे. या निवडणुकीची शहरासह ग्रामीण भागात चर्चा सुरू झाली आहे. प्रत्यक्ष प्रचार सुरू झाला नसला तरी नेते मेळावे, बैठका घेऊन निवडणूकीवर लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.
जीवन पाटील, कार्यकारी संपादक एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार.