KRUSHI DIN :सलाम ! हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांना ..

0
403

कृषी दिन विशेष वृत्तांत

शिरपूर /धुळे -३०/६/२३

१ जुलै कृषी दिन,अर्थात वसंतरावजी नाईक यांच्या ११० व्या जयंती निमित्त त्यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याविषयी सविस्तर जाणून घेऊ या ..
पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष, मुंबई व मध्यप्रदेशचे महसूल खात्याचे उपमंत्री, महाराष्ट्राचे सहकार मंत्री, कृषी मंत्री, महसूल मंत्री याशिवाय सर्वाधिक काळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. विरोधी पक्षांचा आदर करणारा माणूस असा हा त्यांचा जिवन प्रवास. ते सांगायचे की, मला घडविण्यामध्ये “माझ्या आई वडिलांचा, माझ्या भावांचा, माझ्या जनतेचा जेवढा वाटा आहे तेवढाच यशवंतराव चव्हाण यांचा आहे”.
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा श्री. महाराष्ट्र देशा.

कवी गोविंदाग्रज यांनी महाराष्ट्र देशाचे वर्णन आपल्या प्रसिद्ध अशा महाराष्ट्र गीतातून अगदी चपखलपणे केले आहे.
त्यांच्या या काव्यातील ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा…’ यासोबतच आज नव्याने ‘कृषी क्रांतीच्या देशा’ ही वास्तव प्रतिमा जोडण्याची आवश्यकता आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र देशाचा मंगल कलश संतांच्या पावन भूमीत आणला. त्यांना मनापासून साथ सोबत करत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पुरोगामी, कृषी-औद्योगिक महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने पायाभरणी व उभारणी केली. गहुलीसारख्या छोट्याश्या बंजारा तांड्यातील, भटक्या विमुक्त जातीतील वसंतराव नाईक हे राजकारणातील धीरोदात्त, वीर पुरुष. दूरदृष्टी व विजिगीषू वृत्तीच्या या नेत्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची तब्बल साडेअकरा वर्षे कमान सांभाळली. सुरुवातीचा काळ सोपा नव्हता. अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांनी भरलेला होता. पाक, चीन युद्ध, भूकंप, दुष्काळ अशा भल्या मोठ्या संकटांचे आव्हान त्यांनी लीलया पेलले. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या काळात पिण्याचे पाणी तर होते. मात्र, पोटाची भूक भागविण्यासाठी अन्नधान्य नव्हते. भूक आणि रोजगाराचा प्रश्‍न गहन बनलेला होता. तो सोडविण्यासाठी वसंतराव नाईक यांनी कृषी क्रांतीचा ध्यास घेतला.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
‘‘दोन वर्षांत महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी वसंतराव फुलसिंग नाईक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फासावर जाईल,’’ असे पुणे येथील शनिवार वाड्यासमोरील जाहीर सभेत वसंतराव नाईक यांनी भीष्मप्रतिज्ञाचं केली होती. ती पूर्ण करणे एवढे सोपे काम नव्हते. कुठलीही क्रांती सहजासहजी होत नाही. महाराष्ट्राला सुजलाम् सुजलाम् करण्याचे कृषी व्रत संतवृत्तीच्या वसंतरावांनी स्वीकारले आणि कृषी क्रांतीच्या रणांगणात खरे युद्ध सुरू झाले. महाराष्ट्राला नव्हे, तर देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी शस्त्रांची नव्हे तर कृषी शास्त्राची गरज त्यांनी ओळखली. महाराष्ट्रभर सिंचनासाठी त्यांनी धरणे बांधली, बांध-बंधाऱ्यातून ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ हा कार्यक्रम राबविला. भरघोस उत्पादनाच्या संकरित वाणांचा स्वीकार केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भरघोस उत्पादन देणाऱ्या ‘हायब्रीड’ वाणांचा एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे झपाटल्यागत प्रसार-प्रचार केला. शेती तंत्रज्ञान पुरविण्यासाठी महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठांची स्थापना केली.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हायब्रीड ज्वारीचे स्वतः सेलूच्या शेतात प्रयोग केले. ‘आधी केले, मग सांगितले’ या युक्तीतून त्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना भरपूर उत्पादनासाठी उद्युक्त केले. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रात हरितक्रांतीची पहाट झाली. महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. राकट आणि दगडांच्या देशासोबत महाराष्ट्र कृषिक्रांतीचा देश बनला. म्हणूनच आधुनिक महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईकसमृद्धीने नटलेल्या महाराष्ट्राचे कृषिवीर ठरले आहेत. वसंतराव नाईक यांनी दुष्काळाच्या काळात कष्टकऱ्यांच्या हातांना रोजगार देणारी ‘रोजगार हमी योजना’ सुरू केली. वसंतराव नाईक दूरदृष्टीचे नेते होते. या रोजगार हमीच्या कामातून अनेक बंधारे उभे राहिले, असंख्य तलाव खोदण्यात आले. त्यातून सिंचनाची व्यवस्था उपलब्ध झाली. रस्ते बांधण्यात आले. व्यवस्थेला उभारी मिळाली. सोबत रोजगाराचा प्रश्न सुटला. कष्टकऱ्यांना त्यांच्या झोपडीत भाकरी मिळाली. ही योजना आताही तितकीच उपयोगी
ठरली आहे. केंद्र सरकारने ही योजना ‘मनरेगा’च्या स्वरूपात स्वीकारली आहे, यावरून वसंतराव नाईकांच्या दूरदृष्टी धोरणाला अर्थातच मान्यता मिळाली आहे. हा त्यांच्या धोरणाचा गौरव आहे. तळागाळातील कष्टकऱ्यांच्या जीवनाचा अभ्यास, शेतीत शेतकऱ्यांबद्दलची त्यांची कळकळ, त्यातून राज्य शासनाने राबविलेले निर्णय, तयार केलेली धोरणे महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही.
शेती, शिक्षण व रोजगार या त्यांच्या विचारांची पेरणी महाराष्ट्रात झाल्याने समृद्धीचे पीक आज पाहावयास मिळत आहे.असा नेता पुन्हा होणे नाही.!
अशा महान राजनेत्याला कृषी दिनी त्यांच्या ११० व्या जयंती निमित्त त्रिवार अभिवादन !
राज जाधव ,शिरपूर ग्रामीण प्रतिनिधी ,बभळाज,एम डी टी व्ही न्यूज ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here