६ हजार आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकल्पाच्या माध्यमातून समृद्धी
नंदुरबार :- जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगांव तालुक्यात ‘लखपती किसान’ प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील आदिवासींचे होणारे स्थलांतर थांबणार असून या दोन तालुक्यातील ६ हजार आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात या प्रकल्पातून समृद्धी येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील गव्हाळी व धडगाव तालुक्यातील कात्री येथे “शासन आपल्या दारी” मोहिमेत आदिवासी विकास विभाग, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांच्या अर्थसहाय्याने युवा मित्र या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आयोजित ‘लखपती किसान’ प्रकल्पाच्या लाभार्थी मेळाव्यात आज बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार हिना गावित, आमदार आमशा पाडवी, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक प्रमोद पाटील, युवा मित्रच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे व पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी, लभार्थी, शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, स्वत:ची जमीन, शेती असूनही मोठ्या प्रमाणावर येथील आदिवासी नागरिक रोजगारासाठी स्थलांतर करताना दिसत होते. ही बाब लक्षात घेवून या आदिवासी बांधवांना उपलब्ध साधन-संपत्तीवर रोजगार व अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी किसान मित्र प्रकल्पाची संकल्पना समोर आली. प्रायोगिक तत्वावर ही योजना सध्या गेल्या एक वर्षापासून धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात राबवली जात आहे. या दोन तालुक्यातून प्रत्येकी ३ हजार या प्रमाणे एकूण ६ हजार शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प राबवला जातो आहे.
ते पुढे म्हणाले, तीन वर्ष चालणाऱ्या या प्रकल्पासाठी १५ कोटी रूपये खर्च येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमतून आदिवासी शेतकऱ्यांना शेळी पालन,वैयक्तिक विहिरी, सामुहिक विहिरी, सिंचन सुविधा, भाजीपाला बियाणे उपलब्ध करून दिले जाते. तसेच जलसंधारणाची कामे या माध्यमातून परिसरात केली जात आहेत. या प्रकल्पाचे यश पाहता येणाऱ्या काळात अजून काही भागात हा प्रकल्प राबविण्यात येईल, असेही पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मनीषा पोटे यांनी केले. यावेळी प्रकल्पाच्या रूग्णवाहिकेचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. लाभार्थ्यांना शेती आौजारे, बियाणे, शेती उपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले.
दृष्टिक्षेपात किसान मित्र प्रकल्प
- जिल्ह्यात अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात प्रकल्पाची अंमलबजावणी
-आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबविण्यासाठी प्रकल्पाची संकल्पना - गव्हाळी (ता. अक्कलकुवा), कात्री (ता. धडगाव) या ठिकाणी मेळावे संपन्न
- आदिवासी विकास विभाग व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या अर्थसहाय्याने युवा मित्र स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अंमलबजावणी
- तीन वर्ष चालणाऱ्या या प्रकल्पासाठी १५ कोटी रूपयांची तरतूद
- अक्कलकुवा व धडगाव या तालुक्यातून प्रत्यकी ३ हजार प्रमाणे ६ हजार लाभार्थ्यांना होणार लाभ
- आदिवासी शेतकऱ्यांना शेळी पालन,वैयक्तिक विहिरी, सामुहिक विहिरी, सिंचन सुविधा, भाजीपाला बियाणे उपलब्ध करून देण्याबरोबर जलसंधारणाचाही होणार लाभ
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.