विरोधकांच्या वॉकआऊट नंतर चार मिनिटांत सभा सुरू..

0
241

नंदुरबार :२१/३/२३

येथील जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा नियोजित वेळेच्या तब्बल सव्वा तास उलटूनही होत नसल्याने विरोधकांनी सभागृहातून वॉकआऊट केले.

जि. प. ची सभा नेहमी उशिरा होत असल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केला.

दरम्यान ३ वाजून १५ मिनिटांनी विरोधी सदस्यांच्या वॉकआऊटनंतर अवघ्या चार मिनिटांनी सभा सुरू झाली.

यावेळी अवकाळी नुकसान पंचनामे, शिक्षण, आरोग्य आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

जि.प.च्या याहामोगी सभागृहात आज सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, उपाध्यक्ष सुहास नाईक, सभापती गणेश पराडके, हेमलता शितोळे, संगिता गावित, शंकर पाडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व्यासपीठावर उपस्थित होते.

सभेच्या अजेंड्यानुसार दुपारी २ वाजता सभा सुरु होणे अपेक्षित होते.

मात्र सव्वातास उलटून सव्वातीन वाजेपर्यंत देखील जि.प.अध्यक्ष, सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी सभेत उपस्थित न झाल्याने विरोधकांनी सभात्याग करीत वॉकआऊट केले.

दरम्यान, विरोधकांच्या वॉकआऊटनंतर अवघ्या चार मिनिटांनी सभा सुरु होत विविध विषयांवर चर्चा करुन मंजूरी देण्यात आली.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली होती.

मात्र दुपारी सव्वातीन वाजेपर्यंत देखील सभा सुरु न झाल्याने वेळेवर सभा सुरु होत नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग करत वॉकआऊट केले.

याप्रसंगी कॉँग्रेसचे विरोधी पक्षनेते रतन पाडवी, ॲड.सीमा वळवी, निर्मला राऊत यांच्यासह कॉँग्रेसचे जि.प.सदस्यांनी वॉकआऊट केले. प्रत्येक वेळी सभा उशिराने सुरु होते.

सभेच्या अजेंड्यावर दिलेल्या वेळेस आता सव्वा तासांचा कालावधी उलटून देखील सभा सुरु झालेली नाही. आम्ही दुर्गम-अतिदुर्गम भागातून येतो. मात्र सभा उशिराने सुरु होत असल्याने परततांना उशिर होत असल्याने अडचणी येतात.

यामुळे आजची सभा देखील उशिराने सुरु होत असल्याचे सभात्याग करीत असल्याचे रतन पाडवी म्हणाले.
विरोधकांच्या सभात्याग नंतर अवघ्या चार मिनिटांनी (३ वाजून १८ मिनिटे) अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित, उपाध्यक्ष सुहास नाईक, सभापती गणेश पराडके, हेमलता शितोळे, संगिता गावित, शंकर पाडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचे आगमन झाले व सभेला सुरुवात झाली.

दरम्यान, अध्यक्षांना बरे नसल्याने सभा उशिराने सुरु झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. सभेला सुरुवात झाल्यानंतर विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

जि.प.सदस्य भरत गावित म्हणाले, शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्या करतांना अवघड क्षेत्रासह सपाटीवर असलेल्या शिक्षकांना रुजू केले.

मात्र काही शिक्षकांना रिक्त जागेअभावी रुजू करु शकले नाही. त्यामुळे एकाचवेळी बदल्या झालेल्या शिक्षकांच्या तारखांमध्ये तफावत आहे.

यामुळे अशा शिक्षकांवर अन्याय होण्याची शक्यता असल्याने त्यात दुरुस्ती करण्यात यावी. तसेच काही महिला शिक्षिकांना वयाच्या ५३ व्या वर्षी अतिदुर्गम भागातील अवघड क्षेत्रामध्ये पाठविण्यात आले आहे.

ज्या भागामध्ये वाहन जात नाही अशा ठिकाणी या महिला शिक्षिका कशा कर्तव्य बजावणार असा प्रश्नदेखील भरत गावित यांनी उपस्थित केला.
दिव्यांगाचे बनावट प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी करणाऱ्यांची तपासणी करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, याबाबत जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांची चर्चा झाली असून तपासणी शिबिराचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.
जि.प.सदस्या ऐश्वर्या रावल यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आलेल्या सौर उर्जेचे दिवे गेल्या अनेक दिवसापासून बंद अवस्थेत असल्याने ते सुरु करण्यात यावे, अशी मागणी केली.

तर शिक्षण विभागातील पदोन्नतीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून रखडला आहे.

मात्र प्रत्येक सभेमध्ये वाढीव मुदत मागून वेळ मारुन नेली जाते. यामुळे जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी नाराजी व्यक्त करत पदोन्नतीची वाट पाहून अनेकजण सेवानिवृत्त झाले आहेत.

यामुळे पदोन्नती मिळणार कधी? असा सवाल उपस्थित केला.

यावर उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण यांनी याबाबत प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले.

मात्र जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी आता प्रक्रिया किंवा वाढीव वेळ न मागता येत्या दोन दिवसात पदोन्नतींबाबत निर्णय करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहे.

जीवन पाटील ,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here