Nandurbar News – चेक बाऊन्स प्रकरणात आरोपीला एक वर्ष कारावास आणि भरभक्कम दंड…!

0
275
Nandurbar News - चेक बाऊन्स प्रकरणात आरोपीला एक वर्ष कारावास आणि भरभक्कम दंड...!

Nandurbar News : हात उसनवार घेतलेली रक्कम परत न केल्याने आणि दिलेला चेक अनादरीत झाल्याने, आरोपी संदिप स्वामीनाथ शुक्ला याला नंदुरबार येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती स्मीता एस. वानखेडे यांनी एक वर्षाचा साधा कारावास आणि १६,७७,०००/- रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा सुनावली आहे.

फिर्यादी अजित मेवलदास नानकाणी यांनी संदीप शुक्ला यांना १२,००,०००/- रुपये हात उसनवार दिले होते. या रकमेच्या परतफेडीसाठी शुक्ला यांनी नानकाणी यांना धनादेश दिला होता, जो बँकेत वटवण्यास टाकल्यावर अनादरीत झाला. यानंतर नानकाणी यांनी न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम १३८ नुसार खटला दाखल केला होता.

आरोपी संदीप शुक्लाने आपल्या बचावासाठी “चेकबुक गहाळ झाल्याचे” कारण दिले होते आणि चोरी झालेल्या चेकचा दुरुपयोग करून फिर्यादीने खोटा खटला दाखल केल्याचा दावा केला होता. परंतु, खटल्याच्या चौकशी अंती फिर्यादीची कायदेशीर रक्कम आरोपीकडे घेणे असल्याचे सिद्ध झाले. तसेच, आरोपीच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश अनादरीत झाल्याचेही न्यायालयासमोर स्पष्ट झाले.

दिनांक २ मे २०२५ रोजी न्यायालयाने हा निकाल दिला. नुकसान भरपाईची रक्कम दोन महिन्यांत न भरल्यास आरोपीला आणखी सहा महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. या खटल्याचे काम फिर्यादीतर्फे ॲड. सलीम ए. वोरा, ॲड. एम. के. शेख, आणि ॲड. अविनाश एस. राजपूत यांनी पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here