Nandurbar News: रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावर छापेमारी; मुंबई कनेक्शन समोर, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
115
nandurbar-news-railway-ticket-reservation-center-raided

Nandurbar News – नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावर रेल्वे सुरक्षा फोर्सच्या विशेष तपास पथकाने छापेमारी केली. या छापेमारीत 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारभारात मुंबईच्या एका व्यक्तीचे कनेक्शन समोर आले आहे.

रेल्वे तिकीट आरक्षणातून काळाबाजार करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी अँटी टोटिंग फोर्स म्हणजे तिकीट दलाली विरोधातील विशेष तपास पथक कार्यरत आहे. या पथकाला अक्कलकुवा येथील पोस्ट ऑफिसच्या प्रवासी आरक्षण केंद्रातून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार केला जात असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती.

यावरून विशेष तपास पथकाचे अधिकारी संतोष सोनी यांनी काल 26 डिसेंबर 2023 रोजी अक्कलकुवा पोस्ट ऑफिसच्या रेल्वे प्रवासी आरक्षण केंद्रात अचानक छापेमारी केली. सहाय्यक निरीक्षक विवेकानंद माळी, आरपीएफ कॉन्स्टेबल नरेंद्र पाटील यांचाही तपास पथकात सहभाग होता.

(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छापेमारीत रेल्वे तिकीट आरक्षणाच्या कक्षात कार्यरत असलेला एक कर्मचारी ताब्यात घेण्यात आला. फैजान उर्फ खलिफा असे त्या संशयीताचे नाव आहे. पथकाने तपासणी केली असता त्याच्याकडील सॅमसंग कंपनीच्या मोबाईल मधून 13 लाख 32 हजार रुपये किमतीचे प्रिंट काढलेले 324 जेसीआरटी म्हणजे आरक्षित प्रवास तिकीट आढळून आले.

यात प्रवास करून झालेल्या अकरा लाख सोळा हजार रुपयांच्या 277 तिकिटांचा आणि प्रवास बाकी असलेल्या सव्वा दोन लाखाच्या 46 तिकिटांचा समावेश असल्याचे समजते. अक्कलकुवा पोस्ट ऑफिस च्या प्रवासी आरक्षण केंद्रावर कार्यरत असलेला सदर व्यक्ती पोस्ट ऑफिस अथवा रेल्वे विभागाकडील अधिकृतपणे नियुक्त नव्हता; असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

छापेमारीतील तपासात प्रथमदर्शनी आढळले आहे की आरक्षित तिकीट बनवायचे आणि ते कमिशन वर मुंबईतील व्यक्तीला विकायचे; असा कारभार अक्कलकुव्यातील या केंद्रावर चालू होता. तसेच आरक्षण करून देताना प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटात मागे ज्यादा दर आकारणी करून गैरकारभार केला जात होता.

मुंबईतील व्यक्तीच्या मागणीनुसार हा खलिफा आरक्षित तिकीट बनवून पुरवायचा, असे विशेष तपास पथकाच्या निदर्शनास आल्याचे समजते आणि म्हणून विशेष तपास पथकाच्या रडारवर आता मुंबई कनेक्शन आले आहे.

रेल्वे तिकीट दलाली विरोधात कारवाई करणाऱ्या पथकाने मुंबईत एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 2023 या आठ महिन्याच्या कालावधीत 107 गुन्हे दाखल केले असून 128 जणांची धरपकड केली आहे. त्या काळाबाजाराचे धागेद्वारे नंदुरबार जिल्ह्यात पोहोचले आहेत काय हा प्रश्न अक्कलकुवा प्रकरणामुळे चर्चेत आला आहे.

नंदुरबार रेल्वेच्या इतिहासातील बहुदा ही अशा प्रकारची कारवाई प्रथमच होत आहे आणि म्हणूनच जिल्हा वासियांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले गेले आहे.


ब्युरो रिपोर्ट, एम.डी.टीव्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here