नंदुरबार -२७/४/२३
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मंत्रालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,नंदुरबार यांच्या माध्यमातून जिल्ह्यात आपत्ती पूर्व तयारी, क्षमता वर्धन व प्रशिक्षण, (Disaster risk reduction) अंतर्गत जिल्ह्यामध्ये “उष्णतेची लाट (कारणे, परिणाम व उपाय)” या विषयावर प्रशिक्षण व जनजागृती कार्यशाळा शासकीय तंत्रनिकेतन, नंदुरबार येथे नुकतीच संपन्न झाली.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन, मंत्रालय, मुंबई यांच्याद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उष्णतेची लाट कृती आराखडा 2022-23’ नुसार नंदुरबार जिल्ह्याचा अतितीव्र उष्मलाट प्रवण जिल्हांमध्ये समावेश होत आहे.
मागील काही वर्षापासुन नंदुरबार जिल्ह्यात मार्च ते मे कालावधीत 40 अंश सेल्सीयस पेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
सार्वजनिक ठिकाणी नागरीकांमध्ये, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यामध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा नंदुरबार यांच्याद्वारे महाविद्यालयाच्या समन्वयाने प्रशिक्षण व जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.
या कार्यशाळेत उष्णतेची लाट त्यांची कारणे, परिणाम व उपाय या विषयी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सल्लागार सुनिल गायकवाड यांनी सहभागी सर्व विद्यार्थींना मार्गदर्शन, माहीती दिली. वाढत्या तापमानवाढीमुळे मानवीशरीर, वन्यप्राणी, पशुपक्षी, शेती तसेच पर्यावरणावर होणारे परिणामांवर लक्ष वेधण्यात आले.
अती उष्णतेमुळे मनुष्य व प्राणी यांना उष्माघाताचा त्रास होत आहे. याच्या बचावासाठी काय करावे, काय करू नये या उपाय योजनांबाबत विद्यार्थ्यांना माहीती देण्यात आली.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस. घ्यावे, लस्सी / ताक / कैरीचे पन्हे / लिंबू पाणी नियमित सेवन करावे, गुरांना / पाळीव प्राण्यांना सावलीमध्ये ठेवण्यात यावे.
घरातील गरोदर महीला, लहान मुले, वृध्द, आजारी व्यक्ती अधिक काळजी घेण्यात यावी, घराच्या छतावर- झाडांजवळ पशुपक्षांसाठी पाणी ठेवावे. तसेच उष्माघातापासुन स्वत:ची व कुंटुंबातील सदस्य यांची काळजी घ्यावी.
शरीरास घाम सुटणे, वारंवार तहान लागणे, शरीर शुष्क होणे व थकवा येणे, ताप येणे 102 पेक्षा अधिक जास्त ताप वाढणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके, पोट दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचेन अवस्था होणे कधी कधी बेशुद्ध अवस्था किंवा उलटी होणे अशी उष्माघाताची लक्षणे दीसताच तात्काळ रुग्णालयाशी संपर्क साधावा याबाबत माहीती देण्यात आली.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी व वातावरणातील उष्णता कमी करण्यासाठी झाडे लावण्यात यावे तसेच प्रदुषण नियंत्रण करण्यात यावे.
या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन पाबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन भरत सानप यांनी केले.
प्रविण चव्हाण ,एम डी टी व्ही न्यूज , जिल्हा प्रतिनिधी ,नंदुरबार.