NASHIK :शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न ..

0
725

नाशिक : १५/७/२३

त्यांनी हसतमुखाने दुसरा उपमुख्यमंत्री देखील स्वीकारला…’; CM शिंदेंकडून फडणवीसांच्या मोठेपणाचं तोंडभरून कौतुक-
NASHIK :
येथे आज (१५ जुलै) शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजिन करण्यात आले होते, या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे [ EKNATH SHINDE] यांनी अजित पवारांना दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका देखील केली.
या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, काही लोकांना वाटतं आता तीन जण एकत्र आलेत, कसं होणार? आम्ही सगळे समजूतदार आहोत, मी आणि देवेंद्रजी अनेक वर्षांचे मित्र आहोत. त्यांनी पाच वर्ष यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम केलं. त्यांच्या मंत्रिमंडळात मी देखील मंत्री होतो.
आता मी मुख्यमंत्री म्हणून काम करतोय आणि ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या सरकारमध्ये आलेत. मी खरं सांगतो देवेंद्रजींचं मन फार मोठं आहे. मुख्यमंत्री राहिलेला माणूस, मी त्यांना उपमुख्यमंत्री समजत नाही. माझे सहकारी, माझे सोबती समजतो आणि आम्ही त्यांचा अनुभव राज्यासाठी वापरण्याचे ठरवले आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, अजितदादा हे देखील उपमुख्यमंत्री झाले. ते (देवेंद्र फडणवीस) स्वतः उपमुख्यमंत्री असताना त्यांनी हसतमुखाने दुसरा उपमुख्यमंत्री देखील स्वीकारला. हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यांच्यावर कलंक लावण्याचं काम काहीजण करतात. राजकारणातला आणि आमच्या युतीतला कलंक नाही तर निष्कलंक माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव अभिमानाने घेतलं पाहीजे. पण तेवढा मोठेपणा, दिलदारपणा असावा लागतो. पण कोतीवृत्ती, कद्रूपणा असलेल्या व्यक्तीकडून ते शक्य नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरेंना टोला
या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, घरी बसून राहण्यासाठी सत्ता नसते, ही सत्ता लोकांच्या घरापर्यंत जाण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी असते असं मानणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी आम्ही आहेत. घरी जे बसतात, घरातून जे काम करतात त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलू इच्छित नाही. पवार साहेबंनी त्यांच्या पुस्तकात लिहून टाकलं आहे. त्यामुळे घरी बसणाऱ्यांना जनता घरी बसवून टाकते. लोकांमधल्या कार्यकर्त्यांना लोकमध्ये येण्याची संधी देते असे एकनाथ शिंदे म्हणाले.

F1ESmQ1aAAAJOVa
1
F1ESmQ3aQAEHwob
2
F1ESmQ5aEAA eAK
3
F1ESmQraUAA9dk7
4

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
पीएम नरेंद्र मोदींसारखं दुसरं नेतृत्व नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
गेल्या नऊ वर्षांपासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखाली अनेक कामे होत आहेत. त्यामुळे देशातच नव्हे तर जगभरात नरेंद्र मोदींचा करिष्मा आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो आहोत. सरकारमध्ये असल्याशिवाय राज्यातील प्रश्न सोडविणे शक्य होणार असल्याचे सांगत पीएम नरेंद्र मोदींसारखं दुसरं नेतृत्व नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे.
नाशिकमध्ये (Nashik) शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्यानंतर पहिल्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकमध्ये आले आहेत. सकाळी वंदे भारत एक्सप्रेसच्या (Vande Bharat Express) मध्यमातून ते नाशिकमध्ये दाखल झाले. यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन हे करण्यात आले. त्यांनतर शासकीय विश्रामगृहात अजित यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला त्यांनी राज्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याचे सांगत पेरण्या नगण्य झाल्या असून काही ठिकाणी दुबार पेरणीचे (Crop Sowing) संकट आहे. त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी आम्ही तिघे आढावा घेत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. राज्याचा विकासासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो असून आम्ही परिवार म्हणून काम करत आहोत. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून राज्यातील प्रश्न सोडविता येणार आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून देशात पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. अनेक कामे होत आहेत, अनेक प्रकल्प राज्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आहे, तो नाकारता येणार नाही. वंदे भारत एक्सप्रेसने येत असताना अनेक लोकांशी चर्चा केली. त्यानुसार रेल्वेत अनेक लोक साई दर्शनासाठी (Shirdi Sai Baba) जात होते. त्यांनी सांगितलं की, वंदे भारत रेल्वेची सर्व्हिस चांगली आहे. अशा सुविधा लोकांना दिल्या पाहिजे, लोकांच्या मूलभूत गरजा लोकांपर्यंत पोहचविल्या पाहिजे. त्यामुळे देशातच नव्हे जगभरात नरेंद्र मोदींचा करिष्मा असून नरेंद्र मोदींसारखं दुसरं नेतृत्व नसल्याचे सांगत केंद्र सरकारकडून अधिक मदत मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
राज्याला चांगल्या पावसाची प्रतीक्षा-
दरम्यान यावेळी अजित पवार यांनी राज्यातील पावसाच्या (maharashtra Rain) आढावा बाबत माहिती दिली. ते म्हणाले की 15 जुलै पर्यंत राज्यात पाऊस चांगला होतो. मात्र यंदा पावसाचे प्रमाण कमी असून पेरण्या नगण्य झाल्या आहे. तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मागवली आहे. तर उत्तर भारतात जोरदार पाऊस होत आहे, यमुनेच्या पूर आला आहे. एवढा पाऊस कधी बघितला नव्हता. मात्र आपल्याकडे अजून पाऊस नाही. नाशिक जिल्ह्यातील धरण कमी साठा असून कोयना, उजनीला पाणी नसल्याचे सांगत ग्लोबल वार्मिंगमुळे पावसाचे चक्र बदललं असल्याचे ते म्हणाले. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी आम्ही तिघे आढावा घेत आहोत. खातेवाटपानंतर सर्वजण कामाला लागले असल्याचे अजित पवार म्हणाले.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह आदिवासी बांधव, तरुण बेरोजगार यांचे प्रश्न सोडविण्यात येईल. त्यासाठी लागणारा निधी पुरविण्यात येईल. त्यानुसार नाशिक जिल्ह्याच्या कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील अनेक कामांना गती देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.
आता तीन इंजिनचे सरकार
नाशिक जिल्हा हा मिनी महाराष्ट्र असून सगळ्या मंत्र्यावर जबाबदारी दिली असून नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विकासाचे काम होणार असून यासाठी कुठल्याही जातीपातीचे राजकरण न करता सर्व घटकांना एकत्रित घेऊन काम करू असे अजित पवार म्हणाले. महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा असून महाराष्ट्राच्या विकासासाठी देशाच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आता राज्यात दोन इंजिनचे नाहीतर आता तीन इंजिनचे सरकार आले असून महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास अजित पवार यांनी दिला.

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
पोटदुखीवर रामबाण उपाय म्हणजे डॉ. एकनाथ शिंदे’, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला :
सध्या राज्य सरकारकडून शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. ‘पोटदुखीवर रामबाण उपाय म्हणजे डॉ. एकनाथ शिंदे’, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. ”गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या (Maharashtra) कानाकोपऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. मात्र या कार्यक्रमामुळे अनेकांच्या पोटात दुखत आहे. अनेकांची पोटदुखी वाटत आहे. कधी चांगलं काम केलं तरी काहींना पोटदुखी असते. मात्र या पोटदुखीवर औषध म्हणून डॉ. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणले आहेत. तरी फरक पडला नाहीतर आता अजित दादा (Ajit Pawar) आले आहेतच”, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
फडणवीसांचा विरोधकांना खोचक टोला
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ”अजित दादा तुम्ही मागच्या कार्यक्रमात म्हणाले ‘दोनच झेंडे दिसत आहेत, आता तिसरा झेंडा पण आला, काळजी करू नका. आपल्याला तीनही झेंडे घेऊन महाराष्ट्राचा झेंडा देशामध्ये सगळ्यात वर न्यायचा आहे. माझा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करून, तसं आपल्याला करून दाखवायचा आहे. एक वर्ष सरकारला पूर्ण झालं. पहिल्याच वर्षांमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीमध्ये देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम हे आपल्या महायुतीच्या सरकारने करून दाखवलं. कारण जनतेचा विश्वास तर आहे, पण उद्योजक जगताचा विश्वास देखील आता महाराष्ट्रावर आहे. म्हणून आता उद्योगात आपण नंबर वन आहोत. शेतकऱ्यांच्या योजना सगळ्या मार्गावर लागल्या असून ही गती वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत”, असंही फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस ,ना. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शासन आपल्या दारी अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी लोकप्रतिनिधी ,खासदार ,आमदार व्यासपीठावर उपस्थित होते .. लाभार्थींना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र प्रदान करण्यात आले .. पोलिसांच्या बँड पथकाने राज्य गीत जय जय महाराष्ट्र माझा सादर केले तर याच पथकाने राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप केला .. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी योगदान दिले .. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिसांनी उल्लेखनीय कार्य बजावले ..
यावेळी जिल्हाधिकारी गंगाधरण डी यांनी प्रास्ताविक केले तर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आभार मानले ..
तेजस पुराणिक, जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here