सामाजिक कार्यकर्त्यांची पालिका मुख्याधिकार्यांकडे मागणी
नंदुरबार-शहरातील महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वरुढ पुतळ्याजवळ बॅनर लावण्यास बंदी घालावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागूल यांना देण्यात आले.
नंदुरबार शहरातील मार्केट कमिटी जवळ अखंड हिन्दुस्थानचे आराध्य दैवत श्री महाराणा प्रतापसिंहजी यांचा अश्वरुढ पुतळ्या उभारण्यात आला आहे. पुतळ्याच्या आजू-बाजूस राजकीय पुढार्यांचे वाढदिवस व धार्मिक अशा विविध प्रकारचे बॅनर, बोर्ड, फ्लेक्स लावण्यात येतात. पुतळ्याजवळ अशा प्रकारे बॅनर्स, पोस्टर्स लावले जात असल्याने अनेक जणांनी भावना दुखाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
महाराजांच्या पुतळ्यास अशा प्रकारे बॅनरने घेरले असताना त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणचे बॅनर हटवून तिथे कुणीही बॅनर-पोस्टर्स लावू नये अशा आदेशाचा फलक लावण्याची आवश्यकता आहे. पालिकेने याचे गांभीर्य घ्यावे अन्यथा राजपूत समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर भुषण राजपूत, द्विग्विजय राजपूत, जितेंद्र गिरासे, विवेक पाटील, किरण सोनवणे, भरत माळी आदींच्या सह्या आहेत.