विषमुक्त भाजीपाला उत्पादनाला मिळणार चालना !पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका

0
151
Poison-free vegetable production will get a boost!

नंदुरबार : भाजीपाला पिकांची दर्जेदार व किडरोग मुक्त रोपे निर्मिती करुन उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे तसेच आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करण्याच्यादृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे.

कृषी उत्पादनाच्या निर्यातवाढीसाठी नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेल्या किड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी वाढत आहे. भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरीता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना ही राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे.

फलोत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. भाजीपाला पिकाचे निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे आणि म्हणूनच भाजीपाला बियाणांच्या चांगल्या जाती व चांगली रोपे यांची मागणी वाढत आहे.

अशी होते लाभार्थीची निवड

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान ०.४० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. रोपवाटीका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असावी. तसेच लाभार्थी निवडतांना महिला कृषी पदवीधारकांना प्रथम, महिला गट, महिला शेतकरी द्वितीय आणि भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यअल्प भुधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्यक्रम देण्यात येतो.

तर लाभ मिळणार नाही

खाजगी रोपवाटीकाधारक, राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान, पोकरा किंवा इतर योजनेमधून संरक्षित शेती (शेडनेट व हरितगृह) घटकाचा लाभ घेतलेले लाभार्थी या योजनेच्या लाभास पात्र राहणार नाहीत.

9113240f 0d2b 4bde 9d79 29353e5031cc

असे मिळते अनुदान

टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा, इत्यादी व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटीकेची उभारणी करण्यात येते. रोपवाटीका उभारणीकरीता १००० चौरस मीटरच्या शेडनेट गृह, पॉलिटनेलसह साहित्य खर्चाच्या ५० टक्के २ लाख ७७ हजार ५०० रुपयांच्या मर्यादेत अनुदान देण्यात येते. योजना प्रकल्प स्वरुपात राबवायची असल्याने शेडनेट गृह, पॉलिटनेल, प्लास्टिक क्रेट व पॉवर नॅपसॅक स्प्रेअर या चारही घटकांची एकाच ठिकाणी उभारणी करणे बंधनकारक राहील.

उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प उभारणीनंतर प्रथम मोका तपासणी करुन अनुज्ञेय अनुदानाच्या ६० टक्के अनुदान प्रथम हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येतो.

cd4e172f 3306 4be1 94ef 154a8830b605

रोपवाटीकेतील रोपांची प्रत्यक्ष विक्री, उचल झाल्यावर मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत द्वितिय मोका तपासणी करून उर्वरित ४० टक्के अनुदान दुसरा हप्ता लाभार्थाच्या आधार संलग्न बँक खात्यावर वितरीत करण्यात येतो.

रोपवाटीकेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र, तळेगाव- दाभाडे, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, नाशिक, जालना, कृषी महाविद्यालय, नागपूर आणि उद्यान महाविद्यालय, अकोला येथे तीन ते पाच दिवसांचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.

या संकेतस्थळावर करा अर्ज

योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर किंवा तालुका कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज करता येतील. यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

✍️ संकलन ✍️

संदीप गावित,उपसंपादक
जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here