मुंबई -७/७/२३
राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील प्रथम आगमनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजभवन येथे आज नागरी सत्कार करण्यात आला.राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
समानता व भक्तीचा संदेश देणारे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम यांसारखे संत, आत्मसन्मान व राष्ट्र गौरव वाढवणारे छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर या समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य आहे असे सांगून समाजाच्या शेवटच्या घटकासाठी कार्य करण्याची जाणीव राज्याकडून यापुढेही जपली जावी, अशी अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु[Draupadi Murmu] यांनी यावेळी व्यक्त केली.
आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करताना राष्ट्रपती मुर्मू यांनी महाराष्ट्राचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील, आर्थिक व सामाजिक विकासातील तसेच संगीत व लोककला क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले.शिक्षक, नगरसेविका, आमदार, मंत्री, राज्यपाल म्हणून काम केलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे व्यक्तित्व शून्यातून विश्व निर्माण करणारे असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.
आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातून केल्याबद्दल राष्ट्रपतींचे आभार मानून द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यामुळे तेथील पोलीस, सामान्य जनता तसेच प्रशासनाला नवी ऊर्जा मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शासन आदिवासी विकासासाठी अनेक योजना राबवित असून आदर्श आश्रमशाळा निर्मितीसाठी प्रयत्न करीत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील मनोगत व्यक्त केले ..
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई