शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य मार्गदर्शन करा

0
227

पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या सूचना ; जिल्हास्तरीय खरीपपूर्व आढावा बैठक

नंदुरबार :- यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच अवकाळी पावसाच्या पार्श्वभुमीवर बियाण्यांची गुणवत्ता व पेरणीयोग्य कालावधी समजावून सांगण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदूरबारचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत.

जिल्ह्याच्या २०२३ च्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी तसेच कृषीसह विविध यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीयकृत, खाजगी, स्थानिक ग्रामीण बॅंका यांनी दिलेल्या लक्षांकाप्रमाणे कर्ज वितरण करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील ठिबक सिंचनाबाबत शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी.

नॅनो युरियाच्या वापर करून पिकांच्या वाढीसाठी आवश्यक नायट्रोजनची गरज लक्षात घेवून पिकांच्या खतांची गरज पूर्ण करता येते. त्यामुळे युरिया खताची बचत करून जमिनीवर विपरीत परिणाम न होवू देता इतर सरळ व मिश्र खतांचा वापर वाढविता येतो,

त्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ झाल्याची उदाहरणे असल्याचे सांगून डॉ. गावित यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा घेतला आहे, अशा शेतकऱ्यांना पिकांच्या कापणी प्रयोगाच्या आधारावर मिळणारी पिक विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

5560dd1f 4269 447d b683 3fbf71c935b0 1

अवकाळी पावसामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून सुमारे ८ कोटी ५६ लाख ८७ हजार इतका निधी शासनाकडून मंजूर झाला असून तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ वितरित करण्याच्या सूचनाही यावेळी डॉ. गावित यांनी केल्या आहेत.

बैठकीत मागील बैठकीतील सूचनांचे अनुपालन, जिल्ह्याची सर्वसाधारण भौगोलिक परिस्थिती, मागील पाच वर्षातील जिल्ह्यातील तालुका व महिनानिहाय पर्जन्यमान, मागील वर्षातील कृषी उत्पन्न बियाण्यांची प्रत्यक्ष उपलब्धता व चालू खरीप हंगामासाठीचे नियोजन, खत पुरवठा, कीटक नाशके व औजारे, गुणवत्ता नियंत्रण, कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महत्वाच्या योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजना, मुलस्थानी जलसंधारण, बिजप्रक्रिया, मिश्रपिक पद्धती, व इतर तंत्रज्ञान, संभाव्य पर्जन्यमानासंदर्भात करावयाच्या उपाययोजना, नैसर्गिक आपत्ती, चारा उपलब्धता, सहकारी संस्था, कृषी पतपुरवठा, कृषी पंपांसाठी विज जोडणी व डिझेल नियोजन पाणी वापर संस्थांची सद्यस्थिती या विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी यांनी सहभाग घेतला.

राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान

या बैठकीसाठी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त चार शेतकऱ्यांना निमंत्रीत करण्यात आले होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

यात रोहिदास विजय पाडवी, धनपूर ता. तळोदा ( उडीद पिक), दशरथ राज्या वळवी, भादवड ता. नवापूर (मका पिक), दिलीप भामट्या भील, बामखेडा ता. शहादा (तूरपिक) व सखाराम कैस गावित, खोकसा ता. नवापूर (उडीद पिक ) यांचा सामावेश आहे.

4623ed4f 081e 469f 8009 8d27c3304ab5 1

यावेळी खरीप हंगाम २०२३ च्या विविध प्रकल्पातील बियाणे वाटपांचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते ६ शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात बियाणे वितरित करून करण्यात आला. शशिपाल सुपडू गावित, टोकरतलाव ता. नंदुरबार (तूर), संजय नामदास ठाकरे, भुलाणे ता. शहादा (तूर), बोखा खायला वसावे, माळ खु.ता. तळोदा (तूर), जामसिंग शिवण्या पावरा, बिजरी ता. अक्राणी (तूर), सुरेश वाडग्या कोकणी, पळसून ता. नवापूर (भात), कृष्णा भरत पवार, मोरंबा ता. अक्कलकुवा (भात) यांना बियाणे देण्यात आले

यावेळी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेत ‘महाडिबीटी’ पार्टलवर कृषी आयुक्तालयामार्फत काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये जिल्ह्यातील या दोन लाभार्थ्यांना अनुक्रमे मोठ्या व मिनी ट्रॅक्टरचे वितरण यावेळी करण्यात आले. द्वारकीबाई हरकलाल कोकणी, रनाळे खु. ता.जि. नंदुरबार (मोठा ट्रॅक्टर)
व विनोद तुकाराम पाटील, कोळदा ता.जि. नंदुरबार (मिनी ट्रॅक्टर) देण्यात आले.

यावेळी विविध विस्तार योजनेतील पौष्टिक तृणधान्य आरोग्याची शिदोरी व बाजरी पदार्थाचा उद्योग या दोन पुस्तिकांचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here