वैज्ञानिक विचारांची पेरणी करणारे क्रांतिकारी संत सेवालाल महाराज..

0
264

शिरपूर:१३/०२/२०२३

जनतेला विधायक कार्याची दिशा देणाऱ्या क्रांतिकारी संत श्री. सेवालाल महाराज यांच्या १५ फेब्रुवारी बुधवार रोजी २८४ व्या जयंतीनिमित्त शिरपूर तालुक्यातील बंजारा समाज बांधवांच्या वतीने शहरात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील भव्य शोभायात्रेचे (रॅलीचे) आयोजन करण्यात आले.

वर्तमान स्थितीत संत सेवालाल महाराजांच्या विचारांकडे युवापिढी आशावादी नजरेने बघू लागली आहे. याच परिवर्तनाचा प्रवाह आता ग्रामीण भागात पोहोचला असून. शिरपूर येथे १५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांच्या २८४ व्या जयंतीनिमित्त हजारो बंजारा समाज बांधव उत्साहाने सहभागी होणार आहेत.

संत सेवालाल महाराजांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ मध्ये आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलालडोडी गावातील बंजारा समाजात झाला. त्या काळापर्यंत जगावर विज्ञानवादी विचारसरणीने आपले कार्य करायला सुरुवात केली होती. विज्ञानामुळे नवीन शोध लागल्याने जगात विज्ञानाचे महत्त्व समाजाला समजू लागले होते. ज्यावेळी विज्ञानाचे महत्त्व साऱ्या जगाला पटू लागले होते, त्यावेळी दैवी अवतार आदी धार्मिक बाबींना फार मोठे स्थान उरले नव्हते. इ.स. १८ व्या शतकापर्यंत भारतात लक्षणीय सामाजिक सुधारणा झाली होती.

सेवाकार्य, समता, बंधुता यासारख्या विचाराला पुढे आणत जगासमोर एक आदर्श स्थापित केला होता. दैवी, चमत्कारी अवतार आदी गोष्टी टाळून स्व:कर्तृत्वाने सर्व जगावर राज्य करता येते. हे या थोर महान राज्यांचा इतिहास वाचल्यावर लक्षात येते. पृथ्वीतलावर ज्या लोकांनी आपले साम्राज्य स्थापन केले ते सर्व मानव होते. ते कोणीही देव, देवता किंवा दैवी अवतार नव्हते. हाच वैचारिक वारसा पुढे थोर क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांनी बंजारा समाजासह संपूर्ण जगासमोर मांडला आहे.

१८ व्या शतकात भारतात बंजारा समाजात क्रांतीकारी संत सेवालाल महाराजांचा जन्म झाला. सद्य:स्थितीला बंजारा समाजात काही मंडळी असे सांगतात की, ते देवावतारी होते.! त्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहून जगदंबा देवीची पूजा केली. खूप चमत्कारी बाबी केल्या, स्वर्ग-नरक अशा संकल्पना तयार केल्या, शेवटी त्या देवीने त्यांना स्वर्गात नेले. खरे तर या दंतकथा अंधश्रद्धेत वाढ करणाऱ्या आहेत. क्रांतिकारी संत सेवालाल महाराजांनी अशा खुळचट गोष्टींना कधीही स्थान दिले नाही, असा इतिहास सांगतो. संत सेवालाल महाराजांनी समाज व देशाला उद्देशून सांगितलेले विचार आजही प्रेरणादायी आहेत.

‘केणी भजो मत, केनी पुजो मत, भजे पूजेम वेळ वाया घालेपेक्षा कर्म करेर शिको” ‘बालबचियान शिकावो शाळा” (कोणाला भजु नका, पुजु नका, स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा तसेच मुलां बाळांना शाळा शिकवा.) असे अनेक प्रकारचे मौलिक संदेश संत सेवालाल महाराजांनी जगाला दिला आहे.

सेवालाल महाराज हे काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवणारे नव्हते, सत्य परिस्थिती पाहून बोलणारे होते. सुमारे तीनशे वर्षांआधी निसर्ग व मानवाच्या हालचाली पाहून पाण्याच्या समस्याबद्दल त्यांनी लोकांना मार्गदर्शन केले. ते आजही सत्य आहे. विज्ञानाचे महत्त्व त्यांनी समाजाला समजावून सांगितले. सर्व समाज एकत्र यावा, याकरिता महाराज पूर्ण देशभर दौरा करून लोकांना मार्गदर्शन करीत होते. विज्ञान व सत्याचे महत्त्व लोकांना पटवून देत होते. बंजारा समाज हा निसर्गपूजक समाज आहे. परंतू आजही काही तांड्यात जावून पाहणी केल्यास अंधश्रद्धा वाढल्याचे दिसून येते.

त्यामुळे बदलत्या काळानुसार ज्ञान व विज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी युवापिढीने पुढे येऊन काम करणे गरजेचे आहे. विविध माध्यमांद्वारे परिवर्तनपर कार्यक्रमांचे आयोजन करीत समाज प्रबोधनाचे कार्य समाजातील तरुणांनी एकत्र येऊन करावे,असे मत Human development Foundation चे भारतीय महासचिव व बंजारा समाजाचे अभ्यासक तोताराम जाधव यांनी व्यक्त केले आहे.

राज जाधव, शिरपूर ग्रामीण प्रतिनिधी बभळाज,एम डी टी व्ही न्यूज …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here