नंदुरबार -२३/७/२३
प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायीत्व निर्माण करण्याच्या दृष्टीने, सार्वजनकि प्राधिकरणांच्या नियंत्रणाखाली माहिती नागरिकांना मिळवता यावी म्हणून नागरिकांसाठी माहिती मिळविण्याच्या अधिकाराची व्यावहार्य शासन पध्द्त आखून देण्यात आली आहे. त्याचा वापर करुन माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद असलेली माहिती वगळता नागरिक विविध शासकीय सार्वजनिक प्राधिकरणांमधील माहिती एका अर्जाद्वारे प्राप्त करुन घेवू शकतात. त्याकरीता केंद्रीय माहितीचा अधिकार सन 2005 अंमलात आला आहे.
दिनांक 06 जुन 2023 रोजी सलीम सुलेमान बागवान रा. बागवान गल्ली, नंदुरबार या नावाने पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियमान्वये माहिती मिळणे कामी अर्ज सादर केला होता.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
अर्जदार सलीम सुलेमान बागवान रा. बागवान गल्ली, नंदुरबार यांनी मागणी केलेली माहिती त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठविण्यात आली होती, परंतु दिनांक 12 जुलै 2023 रोजी पोस्ट विभागाकडून पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे कळविण्यात आले की, बागवान गल्ली, नंदुरबार येथे सलीम सुलेमान बागवान या नावाचा कोणताही व्यक्ती राहत नाही.
माहितीचा अधिकार अधिनियमान्वये अर्जदार यांनी मागितलेली माहिती देणे संबंधीत शासकीय विभागाला बंधनकारक असते म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सलीम सुलेमान बागवान रा. बागवान गल्ली, नंदुरबार या इसमाचा शोध घेवून त्यांना माहिती देण्यासाठी नंदुरबार शहर पोलीस ठाणे यांना आदेशीत करण्यात आले.
या माहिती अधिकारातील अर्जाबाबत व व्यक्तीबाबत संशय आल्याने नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने देखील गोपनीय माहिती काढली असता सलीम सुलेमान बागवान या नावाचा कोणीही इसम नंदुरबार शहरातील बागवान गल्ली व परिसरात राहत नसल्याचे निदर्शनास आले. टपाल विभागाच्या पोस्टमननेही असा व्यक्ती त्या पत्त्यावर नसल्याचा अहवाल दिला. पोलीसांना त्रास होईल या उद्देशाने खोट्या नावाने केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियमान्वये काही माहितीची मागणी केली म्हणून दिनांक 18 जुलै 2023 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे खोट्या नावाने माहिती मागणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनास खोटे नाव सांगून माहिती मागुन पोलीस विभागाच्या वेळेचा अपव्यय करुन त्रास देण्याच्या उद्देशाने खोटे नाव, पत्ता वापरणाऱ्या अज्ञात इसमाचा कसोशीने शोध घेवून त्याचेवर लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.
खोट्या नावाने अथवा खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने अनावश्यक माहिती मागून शासकीय यंत्रणेच्या वेळेचा व पैश्याचा अपव्यय करणाऱ्या तसेच प्रशासनास व त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही.तसे आढळून आल्यास संबंधीतांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
प्रविण चव्हाण, एम डी टीव्ही न्यूज ,नंदुरबार…