गोपीचंद पडळकरांना धक्का ; विजयी समर्थकांनी जेसीबीवर चढून केला जल्लोष
सांगली : अत्यंत रोमहर्षक व चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत सांगलीच्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर कोणाचे वर्चस्व राहणार ? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर आज झालेल्या सभापती निवडीमध्ये बाजार समितीवर शिंदे गटाच्या शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे संतोष पुजारी तर उपसभापतीपदी काँग्रेसचे राहुल गायकवाड यांची निवड झाली आहे. आटपाडी बाजार समितीवर शिंदे गटाच्या झेंडा फडकल्याने विजयानंतर कार्यकर्त्याकडून जेसीबीवर चढून गुलालाची उधळण करीत जल्लोष करण्यात आला. शिंदे गटाच्या तानाजी पाटील यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना धक्का दिला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
आटपाडी बाजार समितीत आज झालेल्या सभापती, उपसभापती निवडणुकीत शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांनी धक्कातंत्राचा वापर करत गुप्त पद्धतीने झालेल्या मतदानामध्ये विरोधकांना गाफील ठेवत १० विरुद्ध ८ मताने विजय मिळविला. ९-९ समान जागा निवडून येऊनही शिवसेनेने बाजार समितीवर सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा धक्का बसला आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि रासप व भाजपा आणि राष्ट्रवादी याची युती होऊन दोन्ही गटांनी ९- ९ जागांवर विजय मिळविला होता. आज सभापती निवडीमध्ये भाजप-राष्ट्रवादीच्या युतीकडून सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख तर उपसभापती पदासाठी दादासाहेब हुबाले यांनी अर्ज दाखल केला. तर शिवसेना, काँग्रेस आणि रासपाच्या आघाडीकडून सभापती पदासाठी शिवसेनेच्या संतोष पुजारी तर उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या राहुल गायकवाड यांनी अर्ज दाखल केला होता.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
दोन्ही गटाकडून उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने दुपारी दोन वाजता गुप्त मतदान पार पडले. मतदानांतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या संतोष पुजारी आणि काँग्रेसच्या राहुल गायकवाड यांना प्रत्येकी दहा तर राष्ट्रवादीच्या हणमंतराव गायकवाड आणि दादासाहेब हुबाले यांना प्रत्येकी आठ मते मिळाली.
आटपाडी तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीकडे लागले होते. सकाळपासून निवडीकडे लोकांची उत्सुकता ताणली होती. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाकाची आतषबाजी करून आटपाडी शहरातून मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, सांगली.