मराठा समाजातर्फे अनिष्ठ प्रथांना फाटा देत समाजहिताचे ठराव मंजूर
नंदुरबार : – हुंडा पद्धत बंद करावी, लग्नाच्या आधी असलेली प्रिवेडींग शुटींग / फोटोग्राफी बंद करावी, लग्न पत्रिकेत ठरलेल्या वेळेतच लग्न लावावे यासह अशा अनेक अनिष्ठ प्रथांना फाटा देत येथील सुर्यवंशी क्षत्रिय मराठा मंडळातर्फे समाजहिताचे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
श्री.छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात मराठा पंच मडळाची सर्वसाधारण सभा मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद मराठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत माजी अध्यक्ष श्रावण मराठे, मोहन मगन मराठे, योगेश मराठे, मंडळाचे सचिव रमेश मराठे, गोरख मराठे, भाऊसाहेब मराठे, अर्जुन मराठे, मनोहर मराठे, अरुण मराठे, भगवान मराठे, कैलास मराठे, मोतीलाल मराठे, जगदिश जिभाऊ, राजेंद्र मराठे, लक्ष्मण मोतीलाल मराठे, प्रकाश मराठे, धनराज मराठे, भरत मराठे, दिनेश मराठे, पावबा मराठे, पावबा मिस्तरी, योगेश मराठे आदी पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी विविध विषयांवर चर्चा होवून अनिष्ठ प्रथांना फाटा देत समाजहित लक्षात घेता विविध ठराव मंजुर करण्यात आले. त्यात साखरपुड्यात १० पेक्षा जास्त साड्या न देणे, साखरपुड्यात व लग्नात कोणालाही नारळ किंवा वाट्या न देणे / लावणे, लग्नपत्रिका ५० कि.मी.च्या जास्त अंतर असल्यास व्हॉट्सअप किंवा फोन करुन आमंत्रण देणे, पत्रिकेसोबत भाडे देणे बंद करणे, लग्नाच्या आधी असलेली प्रिवेडींग शुटींग / फोटोग्राफी बंद करणे, हळद लावण्याच्या दिवशी पाया पडण्याची प्रथा बंद करणे. (फक्त वराच्या आई-वडीलांचेच पाया पडणे), लग्नात कितीही आहेर केला तरी त्यास वापस कोणतीही वस्तु किंवा साडी (आहेर) देवू नये, लग्न पत्रिकेत ठरलेल्या वेळेतच लग्न लावणे. उशीर करु नये, मूळ लावणे पद्धत बंद करणे यासारखे समाज हितासाठी, समाज उन्नतीसाठी नियमावली सर्वानुमते लागू करण्यात आली.
सर्व समाज बांधवांनी सदर नियमावलीचे पालन करुन समाजाचा नावलौकीक वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद मराठे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार रविंद्र मराठे यांनी मानले.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.