नंदुरबार : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसल्याने तक्रारी करुनही दखल न घेण्यात आल्याने अखेर संपप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी येत्या १५ दिवसात समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने तुर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
नंदुरबार येथील औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सुविधांअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी पाणी नसल्याने अडचणी येत आहेत. तसेच वस्तीगृहात स्वच्छता नाही. वस्तीगृहाबाहेर सुरक्षारक्षक नसल्याने काही मद्यपींकडून विद्यार्थ्यांना दमबाजी करण्यात आल्याचे प्रकार घडले असल्याचे विद्यार्थ्र्यांकडून सांगण्यात आले. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. वस्तीगृहातील खोलीत काही पंखे बंद असून ते सुरु करण्यात आलेले नाहीत. यामुळे विद्यार्थ्याना अडचणींचा सामना करावा लागतो.
याबाबत तक्रारी करुन देखील दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे काल वस्तीगृहातील संतप्त विद्यार्थ्यांनी सोबत हंडा, बादली, टॉवेल, ट्यूबलाईट आदी वस्तू घेवून औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेशदद्वारासमोर ठिय्या मांडला. मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन कायम करण्याचा निर्धार करण्यात आला होता. मात्र याबाबत प्रभारी प्राचार्य योगेश पाटील यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला असता येत्या १५ दिवसात विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन मिळाल्याने ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.
दरम्यान, वस्तीगृह परिसरात सुरु असलेल्या कामामुळे जेसीबीचा धक्का लागल्याने पाईपलाईन फुटली होती. ती दुरुस्त करण्याचे काम सुुरु असल्याचे सांगण्यात आले. तसेच बऱ्याचदा निधी उपलब्ध नसल्याने समस्या सोडविण्यात अडचणी येतात. मात्र येत्या १५ दिवसात समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे तूर्तास विद्यार्थ्यांना आंदोलन स्थगित केले आहे. येत्या १५ दिवसात समस्या न सुटल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा विद्यार्थ्यांकडून देण्यात आला आहे.