Sindkheda News – 14 हजार रुपयेची लाच घेतली, गुन्हा दाखल येथील तहसिल कार्यालयाचे नायब तहसीलदार आणि अधिकारी व कर्मचारी यांच्या नावाने खाजगी पंटर रितेश अरुण पवार यांनी तडजोड अंती तक्रार दाराकडुन 14 हजार रुपये ची लाच घेतांना आज धुळे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून शिताफीने रंगेहाथ पकडले असुन त्यांचे विरुद्ध भ्र.प्र.अधिनियम सन -1988 चे कलम 7 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरच्या प्रकरणात नायब तहसीलदार व अधिकारी, कर्मचारी कोण हयाची उत्सुकतेने सर्वसामान्य नागरिक वाट बघतोय हे पंटर च्या माध्यमातून खरंच उघडकीस येईल अशी दबक्या आवाजात तहसिल कार्यालय परीसरात चर्चा सुरु होती. सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे येथील रहिवासी असून त्याचे व त्यांचे कुंटुबातील तीन सुधारकांच्या नावे मौजे डांगुर्णे येथे एकसामाईक शेतजमीन आहे.
सदर शेतजमीनींचे त्यांना खातेफोड करायची होती. त्यानुसार तक्रारदार हे खातेफोड करण्यासाठी अर्ज व आवश्यक लागणारी कागदपत्रे घेऊन शिंदखेडा येथे तहसिल कार्यालयात गेले असता गेटजवळ खाजगी पंटर रितेश अरुण पवार हे तक्रारदार यांना भेटला.त्यांनी तक्रारदार कडून खातेफोड करण्यासाठी माहिती घेतली आणि दि . 4-10-23 रोजी तहसिल कार्यालयात बोलावले होते.त्याप्रमाणे तक्रारदार व शेतजमीनींचे सहधारक तेथे गेले असता पंटर रितेश पवार यांनी त्यांना तहसिल कार्यालयात घेऊन जावुन तक्रारदार यांचे खातेफोड प्रकरणाचे कामकाज करुन दिले.
त्यानुसार पंटर रितेश पवार यांनी तक्रारदार यांना माझे तहसिल कार्यालयातील नायब तहसीलदार, अधिकारी व कर्मचारी यांच्या शी घनिष्ठ संबंध आहे. असे सांगुन तक्रारदार यांना खातेफोड चा आदेश काढून देण्यासाठी नायब तहसीलदार आणि अधिकारी व कर्मचारी यांना देण्यासाठी तक्रारदार यांचे कडून 20 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. सदर तक्रारदार यांनी धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रार नुसार दि.6-10-23 रोजी तहसिल कार्यालय येथे जावुन पडताळणी केली असता पंटर रितेश पवार यांनी तक्रारदार यांचे कडे पंचासमक्ष तडजोडी अंती 14 हजार रुपये लाचेची मागणी केली असता काल रोजी दि.10-10-23 ला पंटर रितेश पवार यांनी तक्रारदार कडून 14 हजार रुपये स्विकारतांना धुळे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
त्यानुसार त्यांच्या वर भ्र.प्र.अधिनियम सन 1988 कलम 7 अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरची कार्यवाही धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक श्री.अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण , हेमंत बेंडाळे ,रुपाली खांडवी , तसेच पथकातील राजन कदम , मुकेश अहिरे ,प्रविण मोरे, संतोष पावरा , प्रशांत बागुल, गायत्री पाटील ,रामदास बारेला ,प्रविण पाटील, सुधीर मोरे ,जगदिश बडगुजर यांनी केली आहे. सदर कार्यवाही स नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग , नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा.शर्मिष्ठा घारगे – वालावलकर , अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. माधव रेड्डी ,वाचक पोलीस अधीक्षक मा. श्री.नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.
यादवराव सावंत – प्रतिनिधी