नंदुरबार -३०/४/२३
पालकमंत्र्यांसह आमदारांना पराभवाचा धक्का; महाविकास आघाडीचा धुव्वा
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत प्रस्थापितांना हादरा देत जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने बाजी मारत १८ पैकी १४ जागांवर विजय मिळविला आहे.
अभिजित पाटील यांच्या पॅनलने शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक हाती सत्ता स्थापन केली असून ऐतिहासिक परिवर्तन झाले आहे.
या धक्कादायक निकालामुळे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित व आमदार राजेश पाडवी यांना मतदारांनी धक्का दिला आहे.
तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला खातेही उघडता आलेले नाही.
शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.
या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजीत पाटील यांचे शेतकरी विकास पॅनल, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचा नेतृत्वाखाली बळीराजा पॅनल, आमदार राजेश पाडवी व सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांचे लोकशाही आघाडी पॅनल तर महाविकास आघाडीचे शेतकरी परिवर्तन पॅनल अशी चौरंगी लढत रंगली होती.
येथील बाजार समितीत आजतागायत (स्व.) पी.के. अण्णा पाटील यांचा गटाची एकहाती सत्ता होती.यात शेतकरी विकास पॅनलने सर्वाधिक १४ जागा जिंकत प्रस्थापितांना हादरा दिला.
पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या बळीराजा पॅनलला एका जागेवर समाधान मानावे लागले. लोकशाही आघाडीला तीन जागा तर महाविकास आघाडीचा शेतकरी परिवर्तन पॅनलला खातेही उघडता आले नाही.
निकाल जाहीर होतात शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतश बाजी करत जल्लोष केला.
विजयी उमेदवार
सहकारी संस्था (सर्वसाधारण महिला राखीव): पाटील शिलाबाई दगडू (४२८),पाटील हर्षदा अंबालाल(३९५) सहकारी संस्था (इतर मागास प्रवर्ग) : पाटील सत्यानंद प्रकाश (४१४), सहकारी संस्था (भटक्या जमाती): बावा कांतीगीर उमराव गिर (४२३), सहकारी संस्था (सर्वसाधारण): पाटील अभिजीत मोतीलाल (५३१), पाटील जगदीश काशिनाथ(३९४), चौधरी दिलीप लिमजी(३९०), पाटील भानुदास भाऊराव (३८२),पाटील शिवाजी मोतीराम(३७१), पाटील विलास काशिनाथ(३७०), पाटील मयूर दीपक (३६८).
ग्रामपंचायत (सर्वसाधारण): गिरासे मोहनसिंग जयसिंग (५८८), पाटील रवींद्र परसू (५२८). ग्रामपंचायत (अनु. जाती जमाती) नाईक सुरेश सुमेरसिंग (५८२). ग्रामपंचायत (आर्थिक दृष्ट्या दुर्बल):अहेर शांतीलाल छोटूलाल (५७१). व्यापारी मतदार संघ : जैन मोतीलाल मोहनलाल (१२१),जैन रुपेश जसराज (९७).हमाल तोलारी: भिल जिवन जयसिंग (८१)हे विजयी झाले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
यांना पराभवाचा धक्का
बाजार समितीचे माजी सभापती सुनील सखाराम पाटील, उपसभापती रवींद्र केसरसिंग राऊळ, त्याचबरोबर जयप्रकाश रामदास पाटील, भरत दशरथ पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती डॉक्टर भगवान पाटील ,भाजपचे तालुकाध्यक्ष ईश्वर भुता पाटील, विजय दत्तू पाटील ,माधुरी प्रियदर्शन कदमबांडे ,बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश जैन आदी प्रमुख उमेदवारांना पराभव पत्करावा लागला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निरज चौधरी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घनश्याम बागल यांनी काम पाहिले. उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्यूरो, नंदुरबार.