मुंबई -३०/५/२३
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) ते प्रियदर्शनी पार्क दरम्यानचा बोगदा खोदण्याचा (ब्रेक थ्रू) अखेरचा टप्पा कळ दाबून करण्यात आला.
प्रियदर्शनी पार्क येथे टिबीएम ‘मावळा’ यंत्राने बोगदा खोदण्याचा हा अखेरचा टप्पा पूर्ण करताच, याठिकाणी काम करणाऱ्या अभियंते, अधिकारी, कर्मचारी-कामगारांनी एकच जल्लोष केला.

मुंबई किनारी रस्ते प्रकल्पातील बोगदे खणनाचा टप्पा मावळा-टिबीएम यंत्राने पूर्ण केला आहे.
या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास आरोग्यदायी, आरामदायी आणि वाहतुक कोंडीमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मुंबईसाठी हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे.
देशातील अशा प्रकारचा पहिलाच बोगदा आपण पूर्ण केला आहे.
हा प्रकल्प आणि त्यातील बोगदा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत आहोत.
समुद्राखालून जाणाऱ्या रस्त्यांसाठी विविध सुविधाही अत्याधुनिक असतील. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आपण स्थानिक कोळीवाड्यातील भुमिपुत्रांनाही विश्वासात घेतले आहे.
समुद्रातील दोन खांबामधील अंतरही त्यादृष्टीने १२० मीटर्सचे केले आहे. सर्वांना सोबत घेऊन हा प्रकल्प पुढे नेला आहे. पर्यावरणीय अशा सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई