नंदुरबार जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

0
148

नंदुरबार : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरू आहे.

नंदुरबार तालुक्यातील वावद येथील संतोष वसंत पाडवी (वय २६) हे दुचाकीवर (क्र.एम.एच.३९ एएच ७९०२) मेहूल सुभाष पाडवी (वय २३) यांच्यासह आडची येथे जात होते. यावेळी एका वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.एम.एच.४२/३५५०) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून करजकुपा गावाजवळ दुचाकीच्या हॅण्डलला कट मारला. यावेळी मेहूल सुभाष पाडवी यांनी दुचाकीवरुन उडी मारली. तर संतोष वसंत पाडवी हे दुचाकीसह रस्त्याच्या खाली फेकले गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. संतोष पाडवी यांना रिक्षातून उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषीत केले.

मेहूल पाडवी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.कैलास मोरे करीत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत सोनपाल बाबुराम पाल (वय ३५, रा.देहलीया ता.सवाजपूर जि.हरदोई उत्तरप्रदेश) हे दुचाकीने (क्र.यु.पी. ३० बीजी ६३३१) बडवाडी गावाहून अक्कलकुवा येथे उधारीचे पैसे घेण्यासाठी जात होते. यावेळी लक्ष्मण संतोष दहिहंडे (रा.रावेर चितोड रोड, धुळे) याने त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र.सी.जी. १० एएफ ५१६८) डामरखेडा गावाजवळील रस्त्यावर अचानक डाव्या बाजूला ट्रक थांबविल्याने सोनपाल पाल हे दुचाकीसह मागून ट्रकवर आदळल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
नंतर त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत अनकपाल बाबुराम पाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात ट्रकचालक लक्ष्मण दहिहंडे याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत.

तर अक्कलकुवा तालुक्यातील विरपूर येथील मनुसिंग रतन पाडवी हे दुचाकीवर (क्र.एम.एच.३९ टी २८०८) पुतणे नागेश तडवी याचा सोबत अक्कलकुवा येथे सिलेंडर भरण्यासाठी जात होते. यावेळी रस्त्यावर अचनाक खडी आल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात मनुसिंग रतन पाडवी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर नागेश पाडवी यालाही गंभीर दुखापत झाली.
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर कोळी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात मयत मनुसिंग पाडवी याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर कोळी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here