नंदुरबार -१०/४/२३
राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या १० वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या वर्ग-तीन व वर्ग-चार कर्मचाऱ्यांना ६ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार सेवेत नियमित करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला
या निर्णयांमुळे राज्यातील 645 कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आले असल्याचे प्रतिपादन, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी केले.
नंदुरबार येथे एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कुल येथील प्रांगणात रोजंदारी पदावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आल्याचे नियुक्ती आदेशाचे वाटप कार्यक्रम पार पडला.
यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार डॉ.हिना गावित, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करणवाल, सहाय्यक प्रकल्पाधिकारी संजय काकडे, सायरा बानू हिप्परगे, किरण मोरे, संजय चौधरी, माजी नगरसेवक संतोष वसईकर आदि उपस्थित होते.
यावेळी डॉ.गावित म्हणाले की, आज नंदुरबार प्रकल्पांतील नंदुरबार, नवापूर ,शहादा येथील ११३ वर्ग-चार कर्मचाऱ्यांना कायम नियुक्तींचे आदेशाचे वाटप करण्यात आले.
या सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतनस्तरावर वेतननिश्चिती करुन लाभ मिळणारअसून कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता नियमितीकरणाच्या दिनांकापासून लागू करण्यात येईल.
ते पुढे म्हणाले, मागील काळात वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना मोठ्या प्रमाणात कंत्राटी डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले होते
तर सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री असताना राज्यातील १ लाख ३५ हजार अनुशेषाचे रिक्त पदे भरण्यात आली होती तर ५० हजार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच उर्वरित कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाणार असून आदिवासी विकास विभागातील सर्व रिक्त पदे ऑगस्ट पर्यंत भरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या की, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी अनेक आंदोलन,निवेदन देण्यात आली होती
याचा पालकमंत्री डॉ.गावित यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
त्यामुळे या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यात आले असून आदिवासी विकास विभागातील दहा वर्ष पूर्ण झालेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा आदिवासी विकास विभागाने निर्णय घेतला आहे, त्यामुळे कायम झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच पालकमंत्र्यांचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या वर्ग चार प्रकारच्या कर्मचाऱ्यांना कायम नियुक्ती आदेशाचे वाटप करण्यात आले.
जीवन पाटील ,कार्यकारी संपादक, यांच्यासह एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,नंदुरबार