नाशिक :- आदिवासी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. आगामी काळात आदिवासी बांधवांच्या आवश्यक गरजा लक्षात घेवून योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत मखमलाबाद येथे स्विकार तथा संशोधन केंद्र इमारतीचा भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी मंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, राहुल ढिकले, आदिवासी विकास आयुक्त लिना बनसोड, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त तुषार माळी, संदीप गोलाईत, आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विजय पाटील, कार्यकारी अभियंता एस. एस. सांगळे, नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जतिन रहमान यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ना.डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, रोजगाराच्या शोधात येणारे मजूर व इतर विविध कामांसाठी आदिवासी बांधव शहरात येत असतात. त्यांच्या निवाऱ्याची सोय होण्यासाठी या स्विकार तथा संशोधन केंद्राचा उपयोग होणार होणार आहे. या केंद्रात तात्पुरत्या निवाऱ्यासोबतच मजूरांना भोजन तयार करण्यासाठी व्यवस्था ही करण्यात यावी, अशा सूचना डॉ. गावित यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या संशोधन केंद्राप्रमाणे शहरातील विविध भागात कामानिमित्त येणाऱ्या आदिवासी बांधव, मजूर व विद्यार्थ्यांसाठी निवारागृहे उभारण्यासाठी सर्वेक्षण करून स्थळे निश्चित करण्यात यावी. तसेच शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही वसतिगृहांची संख्या वाढविण्याबाबत नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे ‘ड’ यादीत नसलेल्या आदिवासी बांधवांना येणाऱ्या काळात शंभर टक्के घरे देण्यासाठी शासनस्तरावर नियोजन करण्यात येत आहे. आदिवासी बांधवांच्या विकासाच्या दृष्टीने आदिवासी विकास विभागाच्या योजना वाढविणे तसेच शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल घडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी सांगितले.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो. नंदुरबार, नाशिक