आगामी सण, उत्सव सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावे: जिल्हाधिकारी जलज शर्मा

0
118

जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक

7216a930 15ad 49c0 bf76 64adc35f57d1

धुळे : श्रीराम नवमी, हनुमान जयंती, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि रमजान ईद हे सण, उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी येथे केले.

आगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पोलिस प्रशासनातर्फे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर प्रतिभा चौधरी, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे, उपमहापौर नागसेन बोरसे आदि उपस्थित होते.

25032f0f 3305 44b4 8394 e7f239dca8c2

जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले, सण, उत्सवांचा उत्साह सर्वत्र आहे. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने प्रत्येकाने दक्षता घेण्याची गरज आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करून सहकार्य करावे. आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
महापौर श्रीमती चौधरी यांनी सांगितले, आगामी सण, उत्सव सर्व नागरिकांनी शांततामय वातावरणात साजरे करावे. धुळे महानगरपालिकेतर्फे आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे. रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता करून पथदिवे सुरू करण्यात येतील. पाण्याची उपलब्धता करून देण्यात येईल.

विशेष पोलीस महानिरिक्षक श्री. पाटील म्हणाले, सर्व सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाने नियोजन केले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहेत. सर्व नागरिकांनी शांतता, एकोपा आणि सामंजस्य राखून उत्सव शांततेत पार पाडून धुळेचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.

387487c3 435a 4ac5 95a4 76ff2879747d

पोलिस अधीक्षक श्री. बारकुंड यांनी सांगितले, जयंती व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर थोर नेत्यांचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सार्वजनिक मंडळानी प्रचार व प्रसार करावा. उत्सव साजरे करताना सामान्य नागरिकाला त्रास होणार नाही याची दक्षता घेणे, कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून विधायक सुचना मांडल्या. यावेळी जिल्हा प्रशासन, पोलिस दलातील नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here