नंदुरबार : २३/३/२३
तालुक्यातील समशेरपुर येथील आयान मल्टी ट्रेड साखर कारखान्याने १०.६१ लाख टन ऊसाचे गाळप करून हंगाम समाप्तीची घोषणा केली.
जिल्ह्यातील कारखान्याच्या तुलनेत हे सर्वाधिक गाळप झाले आहे. साखर निर्मिती प्रक्रिया अजून दोन दिवस सुरू राहील, अशी माहिती आयान कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे यांनी दिली.
याबाबत श्री.सिनगारे यांनी सांगितले की, कारखान्याने गाळप हंगाम २०२२ २३ अंतर्गत दहा लाख ६१ हजार २७१ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. हंगामातील पहिली उचल २३५० रुपये प्रति शेतकर्यांना अदा करण्यात आली.
चालू हंगामातील ऊस गाळपापोटी आतापर्यंत शेतकर्यांना २०६ कोटी ५३ लाख रुपयेअदा करण्यात आले. साखर उतार्यावर एफआरपी नुसार उर्वरित देयक अदा करण्यात येईल.
शेतकर्यांचे ऊस उत्पादन वाढावे यासाठी बियाण्यात बदल करण्यात आला असून ठिबकचा वापर करणे तसेच अन्य मार्गदर्शन शेतकर्यांना करण्यात येत आहे.
सुधारित जातीचे बियाणे पट्टा पद्धतीने लागवड करण्याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात येत आहे.
यावर्षी पर्जन्यमानाचे विस्कळीत रूप पाहता साखर उतारा कमी मिळाला, गाळप ही कमी झाले. ही बाब लक्षात घेता आगामी कालावधीत नियोजन करण्यात येत आहे.
शेतकर्यांनी ऊस लागवड करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
आयान कारखान्याला शेतकरी, ऊस उत्पादक, वाहतूकदार, कामगार, कर्मचारी, अधिकारी यांचे सहकार्य लाभल्याचे यावेळी श्री.सिनगारे यांनी सांगितले.
कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक पद्माकर टापरे, शेतकी अधिकारी ए.आर.पाटील, ऊस विकास अधिकारी माळी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जीवन पाटील,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार