नाशिक -७/७/२३
गेल्या मार्च महिन्यात जुन्या वादातून सराईत गुन्हेगारांनी एका चारचाकीचा पाठलाग करून त्यातील दोघांवर भरदिवसा गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
कार्बन नाका परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणात संशयितांविरोधात मोक्काअन्वये कारवाई करण्यात आलेली आहे.परंतु गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सापळा रचून अटक केली.
चेतन यशवंत इंगळे (२५, रा. ओम अपार्टमेंट, कर्णनगर, आरटीओजवळ, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. गेल्या १९ मार्च रोजी भरदिवसा कार्बन नाका परिसरात संशयितांनी स्कोडा कारला पाठीमागून धडक दिली आणि दोघांवर गोळीबार केला होता.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याप्रकरणी सातपूर पोलिसात प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे. परंतु संशयित चेतन इंगळे हा तेव्हापासून फरार होता.
शहर गुन्हेशाखा त्याचा शोध घेत असतानाच तो ठाण्यातील घोडबंदर परिसरात असल्याची खबर गुंडाविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या पथकाने सापळा रचून गुरुवारी (ता. ६) सकाळी इंगळे यास ठाण्यातील काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हददीतून सापळा रचून शिताफीने अटक केली.
तपासकामी त्यास सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, याच गुन्ह्यातील फरार गुन्हेगार अक्षय भारती यास गेल्याच महिन्यात शिंदेगावातून अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, डी.के. पवार, प्रदीप ठाकरे, नितीन जगताप, गणेश भागवत, गणेश नागरे, सुनील आडके, राजेश सावकार, अक्षय गांगुर्डे, संदीप आंबरे यांच्या पथकाने बजावली.
असा होता प्रकार:
राहुल पवार याच्या फिर्यादीनुसार, संशयित आशिष राजेंद्र जाधव, चेतन अशोक इंगळे, अक्षय उत्तम भारती, गणेश राजेंद्र जाधव, सोमनाथ झंजार आणि किरण चव्हाण यांनी फिर्यादी व त्याचा साथीदार तपन जाधव यांच्यावर कार्बननाका परिसरात पूर्ववैमनस्यातून गोळीबार केला होता.
फिर्यादी राहुल यानेही यापूर्वी संशयितांपैकी एकाच्या भावाचा खून केला आहे. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून काटा काढण्यासाठी हा गोळीबार झाल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. याप्रकरणी संशयितांविरोधात मोक्काअन्वये कारवाई करण्यात आलेली आहे.
तेजस पुराणिक ,नाशिक जिल्हा प्रतिनिधी…