शहादा /नंदुरबार -३०/६/२३
वाहनावरील नियंत्रण सुटून कार उलटल्याने दोन युवक जागीच ठार झाले. ही घटना शहादा डोंगरगाव रस्त्यावर महावीर शाळेजवळ गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली. भरधाव कार तीनदा उलटून झाडाला धडक बसल्याने कार चक्काचूर झाली. यात अमरसिंग धनसिंग गिरासे (२९) रा. लोणखेडा व विजय श्रावण सोनवणे (२६) रा. डोंगरगाव, ता. शहादा अशी मयतांची नावे आहेत.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
पोलिस सूत्रांनुसार, गिरासे हे आपल्या कारने (क्रमांक एम.एच. १५- एच.जी. ९८०१ ) शहादाकडून डोंगरगावकडे जात असताना सकाळी साडेनऊ वाजता महावीर इंग्लिश स्कूलच्या समोर काही अंतरावर गाडीवरील त्याचा ताबा सुटला. पावसाच्या रिपरिपमुळे कार नियंत्रित न झाल्याने तीनवेळा उलटली.
रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात उलटून लिंबाच्या झाडाला धडकली. कारमधील दोन्ही जण कारमध्येच दाबले गेल्याने जागीच ठार झालेत. यावेळी कारमधील एअरबॅग उघडल्या तरीही दोघे वाचू शकले नाहीत, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. लोणखेडा व डोंगरगाव येथे अपघाताचे वृत्त कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
दोन जेसीबी मागवून कारला खड्डयातून बाहेर काढण्यात आले. कारचे तुटलेले काही भाग रस्त्यावर विखुरलेले होते. घटनास्थळी शहादा पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेत रहदारी सुरळीत केली. पंचनामा करून शहादा पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली.
डोंगरगाव येथील मयत विजय सोनवणे हा अमरसिंग गिरासे याच्याकडे कामाला असल्याची माहिती मिळाली. दोन्ही जण आपल्या कारने खासगी कामानिमित्त डोंगरगावकडे जात होते. पावसामुळे कारवरील नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, या रस्त्यावर शाळा व कॉलनीजवळ वारंवार अपघात होत असल्याने गतिरोधक बसवावे अशी मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
संजय मोहिते, शहादा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज