२५ वर्षांनंतरही मागणीची दखल नसल्याने नाराजीचा सूर ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नंदुरबार : सन १९९८ पासून ग्रेड पे वाढीची मागणी करण्यात येत आहे. या मागणीस २५ वर्षे उलटूनदेखील तहसिलदार, नायब तहसिलदार यांच्या मागणीची दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे तहसीलदार व नायब तहसिलदार संवर्गाकडून कालपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
या आंदोलनामुळे मार्च एन्डींगच्या पहिल्याच आठवड्यात प्रशासकीय कामे खोळंबली असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, काल तहसिलदार, नायब तहसिलदार संघटनेच्या नंदुरबार जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सदरच्या निवेदनात म्हटले आहे की, महसूल विभागातील नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग २ हे अत्यंत महत्वाचे पद आहे. परंतू नायब तहसिलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग २ चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेने ग्रेड-पे वाढविण्यासाठी पाठपुरावा केला आहे. मात्र तरीदेखील याची दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे संघटनेने नायब तहसिलदार, राजपत्रीत वर्ग २ यांचे ग्रेड-पे ४ हजार ८०० रुपये इतके मंजूर करण्याच्या अनुषंगाने शासनाला यापूर्वीही बेमुदत बंदची नोटीस देण्यात आली आहे.
मात्र तरीही याची दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे तहसिलदार, नायब तहसिलदारांनी कालपासून बेमुदत कामबंद आंदोलन केले. दरम्यान, या आंदोलनामुळे प्रशासकीय कामे खोळंबणार आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले असून सदरच्या निवेदनावर निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजय बागडे, तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, प्रदिप पवार, सुरेश कोळी, भाऊसाहेब थोरात, मिलींद कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, गिरीष वखारे, रामजी राठोड, किसन गावित, वैशाली हिंगे, आर.एस.चौधरी, दिलीप वाणी, आशा सोनवणे, शेखर मोरे आदींच्या सह्या आहेत.