डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार..

0
360

नाशिक -१३/४/२३

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर खडतर ज्ञानसाधना करून विधिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांमध्ये प्रभुत्व संपादन केले.

दलित, शोषित आणि पीडित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले.

ते पत्रकार, शिक्षणतज्ञ प्रज्ञासूर्य, विश्वभूषण होते. त्यांनी ‘लोकशिक्षक’ या नात्याने अनेक शैक्षणिक कार्य करून आपले शिक्षण विषयक विचार मांडले.

बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला.

5 2
1

गलितगात्र झालेल्या मनामनातून समाजक्रांतीचे स्फुल्लिंग चेतवून मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.

त्यांचे जीवन एका उफाळलेल्या महासागरासारखे होते. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे.

त्याचा उपयोग झाला पाहिजे, असे त्यांना वाटत असे.

6 2
2

जो समाज अशिक्षित असतो तो शिक्षणाअभावी सर्वस्व गमावलेला असतो,

शिक्षणाने माणसात कर्तव्य आणि हक्काची जाणीव निर्माण होते, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे

आणि आपल्या शिक्षणापासून वंचित समाजाला शिक्षणाचे महत्त्व अत्यंत सोप्या भाषेत आणि कळकळीने समजावून सांगताना बाबासाहेब म्हणतात, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.”

आपल्या हयातीत त्यांनी अनेक ग्रंथ, लेख लिहून ठेवले आहेत. आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती झपाट्याने बदलत आहे.

आपल्या देशात जातीयवादी फुटीर आणि दहशतवादी शक्ती डोके वर काढत आहेत. बेकारीचे फार मोठे संकट सामान्य जनतेवर कोसळत आहे.

7 1
3

अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार समजावून घेऊन सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक समतेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. बाबासाहेबांनी आयुष्यभर खडतर ज्ञानसाधना करून विधिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांमध्ये प्रभुत्व संपादन केले. दलित, शोषित आणि पीडित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले.

ते पत्रकार, शिक्षणतज्ञ प्रज्ञासूर्य, विश्वभूषण होते. त्यांनी ‘लोकशिक्षक’ या नात्याने अनेक शैक्षणिक कार्य करून आपले शिक्षण विषयक विचार मांडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत चार वर्षे राहिले.

त्यांना उत्तम प्राध्यापकांचे मार्गदर्शनही लाभले. त्यांनी नवा देश पाहिला, नवी संस्कृती पाहिली, नवे ज्ञान अनुभवले, माणसा-माणसातील संबंधांची जाण त्यांना आली. आपल्या भारतीय परिस्थितीची तुलना करण्यासाठी त्यांना नवे आकाश गवसले.

भेदभावाची कृत्रिम बंधने नसलेला मुक्त समाज त्यांनी पाहिला.

नवे जग पाहून ते भारतात आले. भारतात आल्यावर त्यांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न करण्याचे ठरवले.

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याची त्यांना खात्री पटली. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, कायदा इ. विविध शास्त्रांचा अभ्यास केलेला व त्या विषयात पारंगत असलेला शिवाय सामाजिक बांधिलकी मानणारा नेता त्यावेळी बाबासाहेबांखेरीज दुसरा कोणी नव्हता.

8 2
4

त्यांना पर्शियन, संस्कृत, फ्रेंच, जर्मन या परदेशी भाषांचेही अत्यंत चांगले ज्ञान होते.

शिक्षणाचे महत्त्व ओळखणार्‍या बाबासाहेबांनी दि. २० जून, १९४६ रोजी मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय आणि दि. १९ जून, १९५० साली औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. दि. १८ व १९ जुलै,१९४२ रोजी नागपूर येथे संपूर्ण भारतातील पददलित समाजाचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनाकरिता संपूर्ण देशातून ७५ हजार पुरुष व २० हजार स्त्रिया उपस्थित होत्या.

त्याचबरोबर संपूर्ण राज्यातील प्रतिनिधी अधिवेशनाला हजर होते. प्रचंड प्रमाणातील महिलांची उपस्थिती हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य.

या सभेमध्ये डॉ. बाबासाहेबांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश दिला.

समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचे असेल, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण असले पाहिजे, असे बाबासाहेबांचे मत होते.

समाजातील प्रत्येक व्यक्तीने तसेच हरएक संस्थेने शिक्षणाच्या बाबतीत आपल्या तरुण पिढीचे पाऊल पुढे कसे पडेल, या प्रश्नांकडे आपले लक्ष पुरवले पाहिजे व त्या अनुरोधाने आपल्या कार्याची दिशा ठरली पाहिजे.

विद्यार्थ्यांबरोबर बोलताना बाबासाहेब नेहमी म्हणत, विद्यार्थीदशेत ज्ञानार्जन चालू असता त्यांनी आपल्यापुढे निरंतर ज्ञानार्जन हे एकच ध्येय ठेवावे. विद्यार्थीदशा परत प्राप्त होणार नाही, या अवधीत प्रयत्नांची परमावधी करून ज्ञान संपादन करावे.

समाजसेवेस पुढील आयुष्यात विपुल काळ आहे.

विद्यार्थी दशेत व्याख्याने देऊन समाजाचे होणारे तत्कालीक हित हे पूर्ण ज्ञान संपादन झाल्यानंतर जी अनेक प्रकारे अधिकार प्राप्तीने सेवाकरिता येऊन समाजाचे हित साधता येईल. त्या हितापेक्षा शतपटीने हिणकस आहे.

या तत्त्वांची पूर्ण जाणीव ठेवून शिक्षण प्राप्ती हेच आपले सध्याचे ध्येय ठेवावे,” असे ते विद्यार्थ्यांना मोठ्या कळवळ्याने सांगत असत.

केवळ बाराखड्या शिकवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर मुलांची मने सुसंस्कृत करणारे दर्जेदारशिक्षण शाळांनी दिले पाहिजे.

इतका सूक्ष्म विचार बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षणाबाबत केला होता.

बाबासाहेबांच्या मते, प्राथमिक शिक्षणाचा प्रसार हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.

प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे. केवळ लोकांच्या खुशीवर हा प्रश्न सोडविल्यास प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होण्यास कैक शतके लागतील. म्हणून प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत सक्तीचा कायदा करावा लागतो.

आघाडीस आलेल्या जगातील सर्व देशांनी सक्तीचा कायदा करूनच लोकांची निरक्षरता हद्दपार केली, असे आपणास दिसून येते.

जे वर्ग आधीच शिक्षणाचा लाभ घेतात, त्यांच्यावर शिक्षणासाठी अर्थातच सक्ती करावी लागत नाही. ज्यांना शिक्षणाचे महत्त्व कळत नाही व जे त्या बाबतीत उदासीन असतात, त्यांच्याकरिताच सक्तीच्या कायद्याची आवश्यकता असते.

म्हणून या देशात शिक्षणामध्ये मागासलेले जे वर्ग आहेत, त्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे.

प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत कायद्याने सक्ती करणे अत्यंत गरजेचे आहे, तर जे व्यक्तिसमूह बौद्धिकदृष्ट्या उच्च शिक्षणाचा महत्तम लाभ घेण्यास असमर्थ आहेत. पण, आर्थिक स्थिती योग्य नाही म्हणून किंवा अनेक अडचणी आहेत म्हणून, असे वर्ग या शिक्षणाच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांना उच्च शिक्षणाच्या सुविधा पुरवण्यासाठी विद्यापीठ ही प्राथमिक स्वरूपाची यंत्रणा आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटत.

केवळ लिहिण्या-वाचण्याचे ज्ञान पुरेसे ठरणार नाही, तर शिक्षणाच्या उच्च टोकापर्यंत पोहोचले पाहिजे, म्हणजे त्यांच्याबरोबर वाटचाल करून संपूर्ण समाजाचा दर्जा उंचावेल.

मिलिंद महाविद्यालयाच्या शिलान्यास प्रसंगी बोलताना बाबासाहेब म्हणतात, “हिंदू समाजाच्या अगदी खालच्या थरातून आल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व किती आहे, हे मी जाणतो. खालच्या समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याचे मानण्यात येते, पण ही चूक आहे. कारण, हिंदुस्थानातील दलित समाजाची उन्नती करणे म्हणजे त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा यांची सोय करून पूर्वीप्रमाणे त्यांना उच्च वर्गाची सेवा करण्यास भाग पाडणे नव्हे.

खालच्या वर्गाची प्रगती मारून त्यांना दुसर्‍याचे गुलाम व्हावे लागत असल्यामुळे त्यांच्यात निर्माण होणारा न्यूनगंड नाहीसा करणे, हे खरे शिक्षणाचे ध्येय आहे.”

आमच्या सर्व सामाजिक दुखण्यावर उच्च शिक्षण हेच एकमेव औषध आहे.

विद्यापीठाच्या प्राध्यापकांबाबत बाबासाहेब म्हणतात की, “प्राध्यापकांनी अध्यापन आणि अध्ययनात स्वतःला इतके गुंतवून घ्यावे की, आपल्या घराकडेही बघण्याची सवड त्यांना मिळू नये, ते काम त्यांनी त्यांच्या पत्नीकडे सोपवावे.

संशोधन करावे.

त्याचप्रमाणे प्राध्यापक नुसता विद्वान असून चालत नाही, तर तो बहुश्रुत असला पाहिजे, उत्साही असला पाहिजे, आपला विषय अधिकाधिक माहितीपूर्ण, मनोरंजक करू शकेल, अशी धमक त्याच्याकडे असली पाहिजे. शिक्षण ही तलवार आहे, शिक्षण हे शस्त्र आहे.

जर एखादा मनुष्य येथे तलवार घेऊन आला, तर आपण सर्वजण त्यांना घाबरून जातो. परंतु, विद्येचे शास्त्र हे नेहमी वापरणार्‍यावर अवलंबून असते. हत्याराने अबलांचे संरक्षण मनुष्य करू शकेल. चांगल्या माणसाच्या हातात शस्त्र असणे उत्तम.

परंतु, वाईट माणसाच्या हातात शस्त्र असणे बरे नाही. शिक्षण घेतलेल्या माणसाच्या अंगी शील व सौजन्य नसेल, तर तो हिंस्र पशूपेक्षाही क्रूर व भीतीप्रद समजण्यात यावा. केवळ शिक्षण घेतले म्हणजे योग्यता येते, असे वाटत नाही. मनुष्य विद्वान झाला की, तो समाजाला उपयुक्त होतोच, असे नाही.

शिक्षणाबरोबर माणसाच्या अंगी शील असणे महत्त्वाचे आहे.”

विद्यार्थ्यांनी काय शिकावं हे विद्यापीठ ठरवित असलं, तरी आपल्या बौद्धिक विकासाला आपण शिकलो ते खरोखरच पोषक व आवश्यक आहे की नाही, हे प्रत्येक विद्यार्थ्याने पाहिले पाहिजे. त्यांच्या भावी जीवनाची उभारणी या ठिकाणी होत असते.

तो राष्ट्राचा आदर्श नागरिक होणार की, त्याचे जीवन विफल होणार, हे ही शिक्षणक्रमच ठरवित असल्यामुळे विद्यापीठाच्या प्रत्येक हालचालीवर विद्यार्थ्यांचे कटाक्षाने लक्ष असले पाहिजे. गुणभेदाचे अंतर नाहीसे झाले पाहिजे, यासाठी शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे.

आपण फार जागृत झाले पाहिजे, संधी प्राप्त होणे आणि ती पदरात पाडून घेणे हे आपल्याकडे आहे.

शिक्षणाच्या अभावी हे साध्य होत नाही.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा.https://bit.ly/3UoK7E0

आज समाजात अत्यंत निकडीचे कोणते कार्य असेल, तर ते शिक्षण प्रसार होय.

समाजातील प्रत्येक व्यक्तीने तसेच संस्थेने शिक्षणाच्या बाबतीत आपल्या तरुण पिढीचे पाऊल पुढे कसे पडेल, या प्रश्नांकडे आपले लक्ष पुरवले पाहिजे व त्या अनुरोधाने आपल्या कार्याची दिशा ठरवली पाहिजे.

शिक्षणामुळे परिवर्तन होते, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारांचे सूत्र आहे.

समाजाचा विकास करायचा असेल, तर शिक्षणापेक्षा दुसरे मोठे साधन या जगात नाही.

कारण, शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे, यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाढ श्रद्धा होती.

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज घडविण्यासाठी शैक्षणिक क्रांतीची आवश्यकता असल्याची जाणीवही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना होती. ‘व्यक्तीला जाणीव करून देते तेच शिक्षण’ अशी शिक्षणाची व्याख्या त्यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामाला त्याच्या गुलामीचे गुपित सांगताना सांगितले की, “उपासमारीने शरीराचे शोषण कमी झाल्यास माणूस अल्पायुषी होतो.तसेच, शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणीच दुसर्‍याचा गुलाम होतो.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली शैक्षणिक क्रांतीची लाट या देशात खरे तर अजून आलीच नाही.

ती यावी असे वाटत असेल, तर अजून वेळ गेलेली नाही.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा.https://bit.ly/3UoK7E0

त्यासाठी गरज आहे ती शैक्षणिक धोरण राबवणार्‍या शासनाच्या मनोवृत्तीत बदल होण्याची.

आजच्या युगात ज्ञान ही विकासाची गुरुकिल्ली असताना एखाद्या समूहाला त्यापासून वंचित करणे म्हणजे एकप्रकारे त्यावर नव्या प्रकारची गुलामगिरी लादणे होय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारांमुळे दलित, पीडित, वनवासी समुदायात कमालीचे परिवर्तन दिसून येत आहे.

त्याचबरोबर संपूर्ण भारतीय समाजव्यवस्थेतदेखील परिवर्तन घडून येत आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा.https://bit.ly/3UoK7E0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण विषयक विचारांच्या विश्लेषणावरून त्यांच्या मानवीय जीवनाच्या सफल आणि प्रतिष्ठापूर्ण जीवन जगण्यासाठी शिक्षण हा अविभाज्य घटक असल्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो.

तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज,नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here