नंदुरबार : येथील रहिवासी व शिंदखेडा तालुक्यातील जखाने येथील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील कलाशिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी नखचित्रांच्या माध्यमातून कागदावर श्रीमद् भगवद्गीता साकारली. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी ७०० श्लोकातील १४०० ओळी नखचित्र कलेच्या माध्यमातून लिहिल्या होत्या. याची दखल इंडिया बुक ऑफ द रेकार्डने घेतली असून खा.डॉ.हीना गावित,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते श्री.सोनवणे यांचा गौरव करण्यात आला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मानवी जीवनात चित्रकलेचे अनन्य साधारण महत्व आहे. चित्रकलेमुळेच आजतागायत मानवाने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. या कलेमुळे आजपर्यंत अनेक कलावंत समृद्धीच्या क्षेत्रावर पोहचले आहेत. असेच एक कलावंत ज्ञानेश्वर सोनवणे यांनी नखचित्रातून भगवद्गीता साकारली आहेे. श्री. सोनवणे साक्री तालुक्यातील तामसवाडी येथील मुळ रहिवासी असून ते शिंदखेडा येथील विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सन २०२० मध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर नखचित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी श्रीमद् भगवद्गीता साकारण्याचे काम हाती घेतले होते.
भगवद्गीतेतील एकूण ७०० श्लोक म्हणजेच १ हजार ४०० ओळी त्यांनी साकारल्या. दररोज किमान ७ ते ८ आठ तास लिखाण केल्यानंतर त्यांना यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागला. साक्री येथील सुर्वे तात्या हे नखचित्रकार होते. त्यांच्याकडून त्यांनी नखचित्रकलेचे शिक्षण घेतले आणि कोरोनाच्या काळात वेळ मिळाल्याने संधीचे सोने करीत थेट भगवद्गीताच नखचित्रकलेतून साकारली. त्यांच्या या अनोख्या कलाकारीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. यामुळे इंडिया बुक ऑफ द रेकॉर्डने त्यांच्या या कलाकारीची दखल घेत सन्मानित केले आहे.