व्हॅलनटाईन डेला ‘ब्रेकअप’चा निर्णय?..ठाकरे आणि शिंदे गटाची लागणार कसोटी …

0
133

नवी दिल्ली :१४/०२/२०२३

14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलनटाईन डेच्या दिवशी ठाकरे-शिंदे यांच्या ब्रेकअपचा निर्णय होणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे, कारण 14 फेब्रुवारी म्हणजेच उद्या याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार? का पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहणार? याबाबत निर्णय होणार आहे.

याशिवाय सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत निर्णय होणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. या 16 आमदारांवर कारवाई होईल आणि महाराष्ट्रातलं सरकार कोसळेल, असा विश्वास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार व्यक्त करण्यात येत आहे.

या सुनावणीत 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पाठवलेल्या नोटीसबाबत सुप्रीम कोर्टात काय निर्णय होणार, यावर महाराष्ट्राचं राजकारण अवलंबून असणार आहे.

या 16 आमदारांना नोटीस

महाराष्ट्रामध्ये जून महिन्यात सत्तानाट्य सुरू असता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी गुवाहाटीला गेलेल्या 16 आमदारांना तुमच्यावर कारवाई का करू नये? याबाबत 48 तासात उत्तर द्यायची नोटीस पाठवली होती. या 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले. संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोराने आणि चिमणराव पाटील या 16 आमदारांना ही नोटीस पाठवण्यात आली होती.

सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या निलंबनाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश दिले होते. या प्रकरणी आता मंगळवारी सुनावणी होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट,एम डी टी व्ही न्यूज,नवी दिल्ली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here