नंदुरबार : शहरातील करण चौफुली येथील बांधकामाचे निष्कासनाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पथकासह मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून सरकारी कामकाजात अडथळा व शिवीगाळ केल्याप्रकरणी आठ ते दहा जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांच्या माहीनुसार, नंदुरबार शहरातील नगर पालिकेच्या हद्दीतील धुळे चौफुली, नवापूर चौफुली, करण चौफुली व महाराणा प्रताप चौक या ठिकाणी वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्ता सुरक्षा व वाहतूक नियोजन मोहीम शुक्रवारी राबविण्यात आली. या मोहीमेदरम्यान पालिकेचे बांधकाम अभियंता गणेश गावित व त्यांचे पथक करण चौफुली येथील बांधकामाचे निष्कासन करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी तेथील काही स्थानिकांनी चौफुलीजवळील बांधकामाचे निष्कासन करु नका असे सांगितले. तसेच मुख्याधिकाऱ्यांना बोलविण्याचा आग्रह धरला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यानुसार मुख्याधिकारी पुलकीत सिंह करण चौफुली येथे पोहचले असता जमावातील काही जणांनी घेराव घातला. तसेच सरकारी कामकाज करण्यात अडथळा निर्माण केला. काही जणांनी मोठ्याने आरडाओरड करुन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यादरम्यान, गणेश गावित व पथकातील कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी पुलकीत सिंह यांना शासकीय वाहनात बसवून रवाना केले.
गणेश गावित यांच्या फिर्यादीवरुन ८ ते १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाटील करीत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार