माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा झेंडा!
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्र्यांचा पॅनलचा पराभव!
१८ पैकी १७ जागांवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व!
हमाल मापाडी गटात शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवाराचा विजय!
नंदुरबार : आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित व माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ता कायम ठेवण्यात चंद्रकांत रघुवंशी यांना यश आले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरत असलेल्या या निवडणुकीत बाजार समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. या निवडणुकीत एकूण १८ पैकी १७ संचालक शिवसेनेचे तर एका जागेवर पुरस्कृत अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचे पूर्ण पॅनल पराभूत झाले असून त्यांचे भाऊ यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विजयानंतर चंद्रकांत रघुवंशी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी काल शुक्रवारी मतदान पार पडले होते. सुमारे ९८ टक्के मतदान झाले होते. आज शनिवारी सकाळी ९ वाजेपासून जी.टी.पाटील महाविद्यालयासमोरील आयटीआयच्या हॉलमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला. व्यापारी मतदार संघातून मतमोजणी करण्यात आली. यात शिरीष मदनलाल जैन ( २६८ ) व प्रकाश अवचित माळी ( २०३ ) हे दोन्ही उमेदवार विजयी झाले. या गटात गिरीश नारायण अग्रवाल ( १४५) व रवींद्रकुमार रिखचंद कोठारी ( १२३ ) यांचा पराभव झाला. येथूनच शिवसेनेचे विजयाचे खाते उघडले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
ग्रामपंचायत सर्वसाधारण गटात दिनेश विक्रम पाटील ( ६१५ ) व विजय लिमजी पाटील ( ६१५ ) मते मिळवून विजयी झाले. तर संजय तुकाराम चौधरी ( ५८१ ) व भास्कर हिरामण पाटील ( ५५५) हे पराभूत झाले. ग्रामपंचायत अनु. जाती- जमाती गटात विक्रमसिंग जालमसींग वळवी ( ६४९) हे विजयी झाले. पालकमंत्री डॉ.गावित यांचे बंधू प्रकाश कृष्णराव गावित ( ५६५ ) यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आर्थिक दुर्बल गटात संजय नरोत्तम पाटील ( ६३४) हे विजयी झाले तर शामू तुकाराम चौरे ( ५७८) हे पराभूत झाले.
सहकारी संस्था मतदार संघातील महिला राखीव गटात संध्या वकील पाटील ( ४४५) व वर्षा शरद पाटील ( ४३४) यांचा विजय झाला. निर्मला नारायण पाटील
( ३७१) व शकुंतला नाना पाटील ( ३५३ ) यांचा पराभव झाला. सहकारी संस्था मतदार संघाच्या इतर मागासवर्ग गटातून मधुकर तुकाराम पाटील ( ४५०) हे विजयी झाले. तर सुधीर रमण पाटील ( ३५६) हे पराभूत झाले. अनु. जमाती गटातून लकडू रामदास चौरे ( ४३९) यांचा विजय झाला. प्रभाकर गणेश वळवी ( ३५३ ) हे पराभूत झाले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सहकारी संस्था मतदार संघातील सर्वसाधारण गटात अनिल रघुनाथ गिरासे ( ३९४ ), गोपीचंद गलचंद पवार ( ३९१ ), किशोर देविदास पाटील ( ४०१ ), सुनील भालचंद पाटील (४२३), कुशलचंद गणपती बिर्ला (४०८), दीपक भागवत मराठे (४०७) व ठाणसिंग भिका राजपूत (४०५) हे विजयी झाले. या गटात रवींद्र भरतसिंग गिरासे (३४०), उमाकांत पुनाजी चौधरी (३५२), जितेंद्र नवलराव पाटील (३५१), बापू देविदास पाटील (३५२), महेंद्र सोमजी पाटील (३६०), किशोर नारायण तांबोळी (३४९) व विक्रांत दिलीपराव मोरे (३७०) यांचा पराभव झाला. हमाल – मापाडी संघात अशोक आरडे (१०९) हे विजयी झाले. तर राजेश हरिभाऊ जगताप (११) व रतिलाल सोना कोकणी (९६) यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
मागील काही दिवसात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटातून भाजपात गेलेले विक्रांत मोरे व रवींद्र गिरासे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. १८ पैकी १७ जागांवर शिवसेनेचे अर्थात श्री.रघुवंशी यांच्या पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत. तर हमाल मापाडी गटात शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक आरडे हे विजयी झाले आहेत. त्यामुळे नंदुरबार बाजार समितीवर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे.
बाजार समितीचा निकाल दुपारी १.३० पर्यंत हाती येणे अपेक्षित होते. मात्र किरकोळ वाद निर्माण झाल्याने एक – दोन जागेवर पुन्हा मतमोजणी घेण्यात आली.
तर सोसायटी मतदार संघासाठी चुरशीची मतमोजणी सुरू असताना टेबल क्रमांक १ वर उमेदवारांना मिळालेले मतांचे २५-२५ चे गठ्ठे बनवण्यात आले होते. दरम्यान आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या उमेदवारांचे २५ मतांचे १४ गठ्ठे असताना कर्मचाऱ्यांनी नजर चुकीने एक गठ्ठा डॉ.गावीत यांच्या उमेदवारांच्या गठ्ठ्यात टाकला. ही कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात ही बाब आणून दिली. यावेळी काहीसा गोंधळ निर्माण झाला. अखेर पोलिसांनी यावेळी हस्तक्षेप केल्याने वाद मिटला.
चंद्रकांत रघुवंशींसह कार्यकर्त्यांनी केला जल्लोष !
निकाल हाती येताच आमदार कार्यालयावर एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजीसह गुलालाची उधळण करण्यात आली. माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी जल्लोष केला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भारती ठाकूर यांनी काम पाहिले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार