शहादा तालुक्यातील डोंगरगाव गावात दारूबंदीसाठी महिलांनी निर्णायक निर्णय घेतला आहे. गावात विनापरवाना दारू विक्रीचे प्रमाण वाढल्याने महिलांनी विशेष महिला ग्रामसभा बोलून एकमताने गावात दारूबंदी करण्यात यावी असा ठराव मंजूर केला.
यावेळी महिलांनी सांगितले की, दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. दारू पिण्यासाठी दारू पिणारे घरातील धान्य, साहित्य देखील विकतात. दारूच्या व्यसनापाई बरेच कुटुंबातील सर्व पुरुष दगावले असून फक्त कुटुंबात महिला सदस्य उरले आहेत.
डोंगरगाव येथे टपऱ्यांवर, लारींवर, जंगलात, रिक्षांमध्ये असे विविध ठिकाणी दारू सर्रासपणे चालू असल्याचे महिलांनी सांगितले. गावात 15 ते 17 वयोगटातील मुलंही दारूच्या व्यसनाधीश झाले असून गावातील तरुणांचे भविष्य अंधारात जात आहे.
दारू पिऊन घरात आणि गल्लीत भांडणे होतात. त्यानंतर कोर्टाची पायरी चढावी लागते. दारूच्या व्यसनापायी घरातील कर्ता पुरुष दगावल्याने एकट्या महिलांवर सर्व जबाबदारी येते आणि मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते.
राज्य उत्पादन शुल्कचे प्रभारी निरीक्षक डी.बी. कोळपे यांनी गावठी दारूचे दुष्परिणाम सांगितले. त्यांनी सांगितले की, गावठी दारू शरीरासाठी विष असून ती धोकेदायक आहे. भविष्यात गावात विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यावर कायद्याच्या हिसका दाखवला जाईल.
गावात दारू बंदी होण्यासाठी सर्व महिलांनी एकमताने बोट वर करून संमती दर्शवली असता सर्वांच्या मते दारूबंदीच्या ठराव मंजूर करण्यात आला.
यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे प्रभारी निरीक्षक डी.बी. कोळपे, सब इन्स्पेक्टर एच.पी. घरटे, सरपंच यमुनाबाई ठाकरे, उपसरपंच संजय पाटील, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, तलाठी सी.टी. ठाकरे, पोलीस पाटील व ग्रामपंचायतमधील सर्व सदस्य पदाधिकारी तसेच बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संजय मोहिते, शहादा