सिंधुदुर्ग: १२ फेब्रुवारी २०२३
पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्यूनंतर कोकणातं राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
या प्रकरणावरुन खासदार विनायक राऊत यांनी गंभीर आरोप केले. आरोपी राणेंच्या जवळचा असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला होता.
यावर आता भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी पलटवार केला आहे. ”या प्रकरणातील आरोपीला उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी गेल्या वर्षभरात कितीवेळा भेटले याचा खुलासा आधी दोघांनी करावा मगच राणेवर बोलावे” असे निलेश राणे यांनी सुनावले आहे
या संदर्भात निलेश राणे यांनी एक video ट्विट केला असून त्यात ते म्हणाले की, पत्रकार शशिकांत वारीसे यांचं निधन ज्या गाडीखाली झालं असा आरोप आहे तो गाडीचा मालक आता पोलीस कस्टडीमध्ये आहे, त्याच्यावर 302 चा सेक्शन सुद्धा लागला आहे. पोलीस पोलिसांचं काम सुद्धा करतायेत. आता खा. विनायक राऊत यांनी आरोप केलाय की आरोपी राणे यांच्या जवळ होता.
मला विनायक राऊत यांना हा प्रश्न विचारायचा आहे की हाच आरोपी एक दीड महिन्यापूर्वी कलेक्टर कार्यालयामध्ये रिफायनरी संदर्भात झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याबरोबर तिकडे उपस्थित होता का नाही? रिफायनरीच्या किती मीटिंगमध्ये हा व्यक्ती आणि राजन साळवी भेटले, भेटत असतात आणि मागच्या वर्षभरात त्यांची किती वेळा भेट झाली याचा एकदा राजन साळवीनी तरी खुलासा करावा किंवा विनायक राऊत तुम्ही तरी खुलासा करावा.
विनायक राऊत आरोप करणे सोपं असतं पण तुमची खासदारकीची सगळी काम संपली आहेत का की फक्त उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी राणेवर वाट्टेल ते बोलायचं? सगळं पोलीस तपासात पुढे येणारच आहे पण विनायक राऊत तुम्हाला रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकांनी निवडून दिलंय त्यांच्यासाठी काहीतरी काम करण्यासाठी, उगाच कुठले तरी हवेमध्ये गोळीबार करायचा आणि राणेना कुठेतरी अडकवायचा प्रयत्न करायचा हा एकच कार्यक्रम शिल्लक राहिला का तुमच्या आयुष्यात? खासदारकीला एक दर्जा आहे.
तुमच्या कारकिर्दीत असं काहीतरी करा की त्याच्यामुळे लोक तुम्हाला ओळखतील. आरोप करणे हे तुमचं नेहमीचंच झालं आहे. कोकणची लोक तुम्हाला आता रड्या ओळखायला लागली आहेत. तेव्हा असं बिनबुडाचे आरोप कारण सोडा आणि काहीतरी चांगलं काम करा.
सिंधुदुर्गहून एम डी टी व्ही न्यूज ब्युरो