नर्मदा बचावसह विविध घटकांचे आवाहनाला प्रतिसाद
विविध ठिकाणाहून ग्रामस्थांनी दिला मदतीचा हात
मात्र … शासनाकडून कधी दिली जाणार मदत ?
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील थुवानी येथील करसन्या पाडवी यांचे घर आगीत खाक झाले होते. संसारोपयोगी वस्तूंसह संपूर्ण संसाराची राखरांगोळी त्यांच्या डोळ्यासमोर झाली. या घटनेमुळे पाडवी यांचे कुटुंब रस्त्यावर आले. त्यांना धीर देत या संकटातून सावरण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलन यांच्यासह विविध घटकांच्या माध्यमातून सोशल मिडीयावरुन मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार उकाडवी कुटुंबीयास संसारोपयोगी वस्तूंसह किराणा व ८३ हजाराची मदत मिळाली आहे. त्यामुळे आजही माणूसकी शिल्लक असल्याचे दिसून येत आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
धडगाव तालुक्यातील थुवानी येथील करसन्या नाऱ्या पाडवी या आदिवासी कुटूंबाच्या घराला दि.७ एप्रिल रोजी घरातील सोलरच्या बॅटरीमुळे आग लागली. यात त्यांच्या घराची राख झाली. करसन्या पाडवी यांच्यासह त्यांच्या परिवारातील ९ जण अंगाच्या कपड्यांवर बाहेर आल्याने जीव वाचला असला तरी घरातील सर्वच सामान, अन्नधान्य व कपडे जळून खाक झाले. पाडवी कुटुंब क्षणात उघड्यावर आले.
याबाबत स्थानिक नागरिकांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करत मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर संवेदनशील नागरिकांकडून मदतीचा ओघ सुरु झाला. शहादा इन्कलाब ब्रिगेडच्या संदीप राजपाल यांनी पाच गाद्या, ब्लॅँकेट व काही धान्य पाठविले.
तसेच शिरपूूरहून सुचित्रा वैद्य यांनी किराणा पाठविला. तळोदा येथील ताराबाई मराठे यांनी भांडी, कपडे व धान्य पाठविले. समाजातील विद्यार्थी , शेतकरी, पोलिस अधिकारी, डॉक्टर यांच्यासह सर्व क्षेत्रातील प्रत्येकानी शक्य ती मदत केली आहे. सुमारे ८३ हजार रुपयांची रोकड जमा झाली आहे. तसेच विविध संसारोपयोगी वस्तू देखील मिळाल्या आहेत. यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने मदत करीत माणूसकीचा परिचय दिला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
तर दुसऱ्या बाजूला मात्र शासनाकडून देखील करसन्या पाडवी यांचा संसार उभा करण्यासाठी मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
करसन्या पाडवी यांचे घर जळाल्याने त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे देखील आगीत खाक झाली आहे. यामुळे शासनाने कागदपत्रांच्या नावाखाली त्यांची फाईल अडकवून न ठेवता त्यांना घरकूल योजनेचा लाभ देण्याची अपेक्षा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व यंत्रणेने मनावर घेतले तर हे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे शासनाने पाडवी कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे नर्मदा बचाव आंदोलनाचे चेतन साळवे, लतिका राजपूत यांनी केले आहे.
एम.डी.टी.व्ही. न्यूज ब्युरो, नंदुरबार